मुंबई : पवई आयआयटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने शुक्रवारी मध्यरात्री वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. विद्यार्थी मूळचा दिल्लीतील रहिवासी असून मेटा सायन्सच्या चौथ्या वर्षांत शिक्षण घेत होता. प्राथमिक तपासात शैक्षणिक प्रगतीवरून विद्यार्थी चिंतीत होता. याप्रकरणी पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.
आयआयटी पवईच्या हॉस्टेलमधून उडी मारून विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. मध्यरात्री दोनच्या सुमारास याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. मुलाला तात्काळ जळवच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. त्याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव रोहित सिन्हा असून तो मुळचा दिल्लीतील रहिवासी आहे. त्याचे कुटुंबिय सध्या दिल्लीत राहत असून त्यांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. रोहित मेटा सायन्सच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थी होता. गेल्या चार वर्षांपासून त्याची शैक्षणिक प्रगती अपक्षेपेक्षा कमी होती. त्यामुळे तो तणावाखाली होता. त्याबाबत त्याने त्याच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या मित्रांनाही सांगितले होते. त्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.
रोहित तणावात असल्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याची पडताळणी सुरू आहे. याबाबत त्याच्याशी संबंधित विद्यार्थी, कुटुंबियांकडून माहिती घेण्यात येईल. दरम्यान घटनास्थळावर पोलिसांना कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पवई पोलीस याबाबत पुढील तपास करीत आहेत.
विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ
मागील वर्षामध्ये एकूण आत्महत्येचे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढले आहे. तर याच कालावधीत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण चार टक्क्यांनी वाढले आहे. अहवालानुसार, भारतात २०२२ मध्ये १३,०४४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्. २०२१ मध्ये ही संख्या १३,०८९ इतकी होती, त्यामुळे २०२२ मध्ये थोड्या प्रमाणात घट पाहायला मिळाली होती. ही घट असूनही, एकूण आत्महत्येचे प्रमाण (विद्यार्थी आणि सामान्य नागरिक दोन्हींचा समवेश) २०२१ मध्ये १६४,०३३ होते, जे २०२२ पर्यंत १७०,९२४ पर्यंत वाढले आहे.