लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतदानाची जनजागृती वाढली आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांनाही यानिमित्ताने आवाहन केलं जात आहे. अनेक महाविद्यालयातही जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत. परंतु, बोरीवलीतील ठाकूर महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे चिरंजीव ध्रुव गोयल प्रमुख पाहुणे असलेल्या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थांना जबरदस्तीने सहभागी होण्यास भाग पाडले असल्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय. यावरून आता विरोधकांनी निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमध्ये विद्यार्थ्याने दावा केला आहे की त्यांची ओळखपत्रे जप्त करून त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यास भाग पाडण्यात आलं आहे. ज्या पद्धतीने त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यास भाग पाडले गेले आहे ती लोकशाही आहे का, असा संतप्त सवालही या विद्यार्थ्याने धुव्र गोयल यांच्यासमोर विचारला.

हेही वाचा >> भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

ध्रुव गोयल यांनी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मतदानाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, तुमचे पहिले मत हे खरे मत असेल. तुमच्या आई-वडिलांना, तुमच्या भावंडांचा तुमच्यावर प्रभाव पडू देऊ नका. ते मत तुमचे मत आहे आणि ते तुमच्याकडून आले पाहिजे. ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. एक्स किंवा वाय पक्षाला मत द्या हे सांगण्यासाठी मी येथे आलेलो नाही.

ठाकरे गटाची टीका

विद्यार्थ्यांना जबरदस्तीने कार्यक्रमात सहभागी होण्यास भाग पाडल्याने अनेक विरोधी पक्षांनीही यावर आवाज उठवला. ठाकरे गटाने हा व्हीडिओ शेअर करून भाजपावर टीका केली आहे. “देशात लोकशाहीचा गळा घोटू पाहणाऱ्या भाजपाचा बुरखा ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी टराटरा फाडला. विद्यार्थ्यांची ओळखपत्रे जप्त करून परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांना हजेरीची सक्ती करणाऱ्या या पक्षाच्या हाती देशाचे भवितव्य कसे सुरक्षित असेल?”, असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी महाविद्यालयाची अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. तसंच, कार्यक्रमानंतर या विद्यार्थ्यांवर प्राचार्यांनी संतापही व्यक्त केल्याचं म्हटलं जातंय.