मुंबई : भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश न मिळालेले विद्यार्थी हे परदेशातून शिक्षण घेण्याचा मार्ग स्वीकारतात. मात्र परदेशातील काही विद्यापीठे व महाविद्यालये परदेशी वैद्यकीय पदवीधर परवाना (एफएमजीएल) नियमावली २०२१ च्या नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशी विद्यापीठे किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी भारतात वैद्यकीय नोंदणी करण्यासाठी अपात्र ठरतात. मध्य अमेरिका, उझबेकिस्तानमधील वैद्यकीय विद्यापीठांकडून एफएमजीएल नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ नये असा सल्ला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून देण्यात आला आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (नीट) चांगले गुण मिळूनही अनेक विद्यार्थ्यांना भारतातील महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नाही. अनेक विद्यार्थी खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पात्र असूनही खासगी महाविद्यालयांचे शुल्क भरणे परवडत नाही म्हणून प्रवेश घेऊ शकत नाहीत. भारतात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याऐवजी परदेशांत पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणे परवडते. विद्यार्थी रशिया, अमेरिका, युक्रेन, कझाकिस्तान, फिलिपाईन्स, चीन या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्राधान्य देतात. देशातून दरवर्षी जवळपास २० ते २५ हजार विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जातात. मात्र परदेशामधील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेताना एफएमजीएल नियमावलीप्रमाणे तेथील अभ्यासक्रमाचा कालावधी, शिक्षणाचे माध्यम, अभ्यासक्रम, वैद्यकीय प्रशिक्षण आणि आंतरवासिता या मानकांची पूर्तता न करणाऱ्या विद्यापीठातून विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केल्यास त्यांना भारतात वैद्यकीय व्यवसायाची मान्यता मिळण्यास अडचणी येऊ शकतात. परिणामी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येते.
या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ नये
मेक्सिकोमधील भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या युरेशिया विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य अमेरिकेतील बेलीझ येथील सेंट्रल अमेरिकन हेल्थ अँड सायन्सेस युनिव्हर्सिटी, कोलंबस सेंट्रल युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्सेस आणि उझबेकिस्तानमधील ताश्कंद स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय वैद्यकीय शिक्षण मानकांचे पालन केले जात नसून वैद्यकीय विद्यापीठाच्या आवारामध्ये अपुऱ्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक आणि वैद्यकीय प्रशिक्षण सुविधांची निकृष्ट दर्जा, भारतीय विद्यार्थ्यांच्या छळाच्या घटना, अवाजवी शुल्क, प्रवेश रद्द केल्यानंतर शुल्क परत न देणे या बाबींमुळे या विद्यापीठामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असा सल्ला भारतीय दूतावासाकडून देण्यात आला आहे.
कोणत्या निकषांची पाहणी करावी
परदेशी विद्यापीठ किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी तेथील अभ्यासक्रमाचा कालावधी, शिक्षणाचे माध्यम, अभ्यासक्रम, वैद्यकीय प्रशिक्षण आणि आंतरवासिता या निकषांची पाहणी करूनच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावे. तसेच जे विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत त्यांनी त्यांचे सध्याचे विद्यापीठ एफएमजीएल नियमन २०२१ ची पूर्तता करत असल्यास त्यांचा विचार करून त्वरित मूल्यांकन करावे. संस्थांना मान्यता किंवा काळ्या यादीत टाकण्याबाबत संबंधित देशातील भारतीय दूतावासाचा सल्ला घेऊन त्वरित सुधारणा करण्यात यावी.