मुंबई : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेतच वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला केली. त्यामुळे एसटीचा पास घेण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहण्याची कटकट मिटणार आहे.

सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जूनपासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या पाससाठी ६६.६६ टक्के सवलत दिली आहे. केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते.

यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घेतले जात होते. परंतु, आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. शाळा – महाविद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थी – विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणे करून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. एसटी प्रशासन यासाठी १६ जूनपासून ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबविणार आहे.

तत्पूर्वी सर्व शाळा – महाविद्यालयांतील मुख्याध्यापक व प्राचार्यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र पाठवून शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची यादी तयार ठेवण्याची सूचना केली आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत

राज्यभरात दररोज सरासरी ८ ते ९ लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी एसटीने प्रवास करतात. गेल्यावर्षी ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली होती. यावेळी एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत २४ लाख ५५ हजार विद्यार्थिनींनी पास घेतला होता. तर, याच कालावधीत एकूण २९ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांनी पास काढला होता.