राष्ट्रीय उद्यानातील पाच बिबटय़ांना ‘रेडिओ कॉलर’ बसवणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्याच्या आसपासच्या परिक्षेत्रामध्ये वावरणाऱ्या बिबटय़ांच्या अधिवासाचा शास्त्रीयदृष्टय़ा अभ्यास करण्याच्या उद्देशाने ‘रेडिओ कॉलरिंग’ तंत्राचा वापर केला जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेची मदत घेतली असून पुढील दोन वर्षांमध्ये हा बिबटय़ांच्या अधिवासाचा शास्त्रीय अभ्यास हाती येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय उद्यानात अधिवास करणारे बिबटे बाहेरच्या परिसरात कशा पद्धतीने वावरतात, याचा उलगडा कॉलरिंग तंत्राच्या माध्यमातून होणार आहे.

राष्ट्रीय उद्यानाबाहेरील मनुष्यवस्तीनजीक वावरणाऱ्या बिबटय़ांच्या शास्त्रीय अभ्यासाला ठाणे वनविभागाने सुरुवात केली असताना आता रेडिओ कॉलरिंगसारख्या प्रगत शास्त्रीय पद्धतीचा वापर करून मुंबईतील बिबटय़ांचा अभ्यास केला जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून कॅमेरा ट्रपिंग पद्धतीचा अवलंब करून बिबटय़ांची प्रगणना करण्यात येत आहे. फेब्रुवारीमध्ये जाहीर झालेल्या बिबटय़ा प्रगणना अहवालामधून राष्ट्रीय उद्यानात ४१ बिबटे वावरत असल्याचे समोर आले होते. मात्र गेल्या प्रगणनेतील २१ बिबटय़ांना या प्रगणनेत टिपले गेले नव्हते. त्या वेळी या २१ बिबटय़ांनी राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील परिक्षेत्रामध्ये अधिवास शोधल्याची किंवा स्थलांतर केल्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली होती. त्यामुळे उद्यानातील बिबटय़ाचे स्थलांतर आणि अधिवासाच्या दृष्टीने ठोस शास्त्रीय माहितीचे संकलन करण्यासाठी रेडिओ कॉलरिंग पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.

२००९ साली अशा पद्धतीने अहमदनगर वन विभागाने बिबटय़ांना रेडिओ कॉलर बसवून त्यांचा अभ्यास केला होता. त्या वेळी ‘आजोबा’ नामक बिबटय़ाने माळशेज घाटातून १२५ किलोमीटर अंतर कापून २५ दिवसात राष्ट्रीय उद्यानात स्थलांतर केले होते. याच पाश्र्वभूमीवर मुंबईतील बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावण्यात येणार आहे. ‘वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी’च्या वन्यजीव संशोधिका विद्या अत्रेय सहकारी संशोधकांच्या मदतीने हा अभ्यास करणार आहेत.  पाच बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावण्यात येणार असून त्यांची निवड नेमक्या कोणत्या परिक्षेत्रामधून करण्यात येईल हे निश्चित झाले नसल्याचे त्या म्हणाल्या. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बिबटय़ा प्रथम श्रेणीत सरंक्षित असल्याने या अभ्यासासाठी केंद्रीय पातळीवर परवानग्या घेण्याचे काम सुरूआहे. मुंबईत प्रथमच बिबटय़ाला कॉलर बसविण्यात येईल, असे राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक अनवर अहमद यांनी दिली.

  • रेडिओ कॉलरचा पट्टा बिबटय़ाच्या गळ्याभोवती बसविण्यात येतो.
  • कॉलरमधील सिग्नल उपग्रहाकडे पाठवला जाऊन तारीख, वेळ आणि ठिकाण याची नोंद होते.
  • ही माहिती अभ्यासाकडे पोहचल्यानंतर तो प्राणी कुठे आहे, काय करत आहे, याचा प्रत्यक्ष शोध घेतला जातो.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Study on leopard movements sgnp
First published on: 26-05-2018 at 03:50 IST