अंधेरी-पूर्वच्या जागेसाठी ३ नोव्हेंबररोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करते वेळी भाजपाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे नाव बदलून ‘रडकी सेना’ ठेवायला हवे, अशी टीका केली होती. त्याला ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा – ‘ही निवडणूक माणुसकी विरुद्ध खोकासूर’ आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले, “ही तर…”
“आशिष शेलारांना काहीही म्हणू द्या. घोडा मैदान जवळ आहे. येत्या ३ तारखेला मतदान आहे. निकाल लागल्यानंतर सर्वच स्पष्ट होईल. उद्धव ठाकरेंनी मैदानात या असे उघड आव्हान दिले आहे. यात रडण्याचा काहीच प्रश्न येत नाही. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मैदानात या”, असे प्रत्युत्तर सुभाष देसाई यांनी दिले आहे.
“निवडणुकीचे मैदान असे आहे, की त्यातून पळ काढता येत नाही. एक मात्र निश्चित की येत्या निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि भाजपा सोबत निवडणूक लढवणार आहेत. त्यांना हरवण्यात मजा येणार आहे. आम्ही गेली ५६ वर्ष निवडणुका लढवत आहोत. आमचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडणार नाही” , असेही ते म्हणाले.
“शिंदे गटाच्या काळात ‘साम दाम दंड भेद’ अशा सर्वच मार्गाने कामे होत आहेत. त्यापैकी दाम आणि दंड या दोन गोष्टींचा वापर सर्वाधिक होतो आहे. मात्र, आता सर्वांची परीक्षा होणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल मुंबई मनपाच्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट करणारा असेल. या निवडणुकीनंतर मुंबईची निवडणूक आहे. मुंबईकर गेली २५ वर्ष आम्हाला निवडून देत आहेत. त्यामुळे यंदाही आमचाच झेंडा मुंबई मनपावर फडकेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.