‘मेक इन इंडिया’मध्ये राज्याच्या हिताचे जास्तीत करार व्हावेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले असले, तरी पाच लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे आपले उद्दिष्ट कालमर्यादेच्या आत पार झाल्याचे सांगत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच या साऱ्या गुंतवणुकीचे श्रेय सोमवारी घेतले.
उद्योग खाते हे शिवसेनेच्या देसाई यांच्याकडे असले तरी या खात्याचे सारे निर्णय हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून होतात. उद्योग खात्यात मुख्यमंत्री आपल्याला विश्वासात घेत नाहीत, असा नाराजीचा सूरही मध्यंतरी देसाई यांनी लावला होता. मग मुख्यमंत्र्यांनी देसाई यांना विश्वासात घेण्यास सुरुवात केली.
‘मेक इन इंडिया’च्या नियोजनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बारीक लक्ष घातले. मुख्यमंत्र्यांनी अधिक रस घेतल्याने व विश्वास दिल्याने उद्योगपती राज्याकडे आकर्षित झाले. परंतु त्याचे सारे श्रेय देसाई यांनी घेण्याचा प्रयत्न केला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रभाव पाडण्याकरिताच देसाई यांनी बहुधा आपल्या खात्याने कसे चांगले काम केले हे सांगण्याचा प्रयत्न केला. मी सरकारमध्ये आलो तेव्हा पाच लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. दोन वर्षांच्या आतच हे उद्दिष्ट साध्य झाल्याचे देसाई यांनी दावा केला. देसाई यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही त्याला दाद दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash desai taking credit of six lakh crore investment agreement in maharashtra
First published on: 16-02-2016 at 04:14 IST