मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोटय़वधी रुपयांचा चटईक्षेत्र घोटाळा उघडकीस आणल्यामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले निलंबित पणन संचालक सुभाष माने यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघातून सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधातच मैदानात उतरण्याची ऑफर शिवसेनेने माने यांना दिली असून मंगळवारी त्याबाबत चर्चाही झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १३८.१० कोटी रुपयांचा चटईक्षेत्र निर्देशांक घोटाळाप्रकरणी समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे धाडस दाखविल्यामुळे माने एकाएकी प्रकाश झोतात आले. मात्र या कारवाईने संतप्त झालेल्या मंत्र्यांनीच माने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करीत त्यांना घरचा रस्ता दाखविला. सरकारच्या या कारवाईलाही माने यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. माने यांच्यावरील एकतर्फी कारवाईची चर्चा पुणे परिसरात चांगलीच रंगली असून त्याच्याच लाभ उठविण्याची खेळी शिवसेनेने आखली आहे. त्यानुसार माने यांना सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरविण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू असून पाटील यांनीच माने यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यावर कसा अन्याय केला आहे याचा प्रचार करण्यात येणार आहे. माने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्वपूर्ण चर्चाही झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत माने यांच्याशी संपर्क साधला असता, निवडणूक लढविण्याबाबत विचारणा झाली असली तरी आपण कोणताही निर्णय घेतलेला नसून आपल्यावरील कारवाईबाबत न्यायालयात दाद मागण्यात आल्याचे सांगत माने यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
 माने यांनी निवडणूक लढवावी यासाठी शिवसेना आग्रही असली तरी सरकारी कर्मचाऱ्याला राजीनामा दिल्याशिवाय निवडणूक लढविता येत नाही. त्यातच माने हे सहकार विभागातील असून त्याच्या राजीमान्याचा निर्णय सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याचोदेशाने होईल. त्यामुळे सरकारी नोकरी माने यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोकरीचीच अडचण
सरकारी कर्मचाऱ्याला राजीनामा दिल्याशिवाय निवडणूक लढविता येत नाही. माने सहकार विभागातील आहेत. त्यांच्या राजीमान्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील यांच्याच आदेशाने होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash mane get shiv sena offer
First published on: 17-09-2014 at 04:14 IST