मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीच्या वॉशिंग सेंटरची तोडफोड करणाऱ्या मनसेच्या सात कार्यकर्त्यांवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी सुजित दुबे नामक व्यक्तीने समाजमाध्यमावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या कारवाईनंतर मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा, पण आम्ही दुबेला सोडणार नाही, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

शनिवार २३ ऑगस्ट रोजी अंधेरीत सुजित दुबेने फेसबुक या समाजमाध्यमावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करत शिविगाळ केली होती. ही बाब मनसे कार्यकर्त्यांना समजली. या पोस्टमधील भाषा शिवराळ आणि भावना भडकवणारी होती. त्यामुळे मनसे कार्यकर्ते सुजित दुबे याला शोधायाल निघाले.

दुबे याचे अंधेरी पूर्व येथील महाकाली लेणी रस्त्यावर ‘क्लिन ॲण्ड क्लिअर’ नावाचे वाहन धुण्याचे केंद्र (वॉशिंग सेंटर) आहे. मात्र मनसे कार्यकर्ते येत असल्याची कुणकूण लागताच तो आपले केंद्र बंद करून पसार झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दुबे याच्या मालकीच्या ‘क्लिन ॲण्ड क्लिअर’ नावाच्या वॉशिंग सेंटरची तोडफोड केली.

दुबे कुठेही सापडला तर त्याला सोडणार नाही, अशी धमकीही मनसे कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. सुजित दुबे याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम १९६ (१), २९६, ३५१, ३५२, ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुबे याला नंतर पोलिसांनी अटकही केली होती.

मनसे कार्यकर्त्यांविरोधातही गुन्हा

दुबे याच्या वाहन धुण्याच्या केंद्राची तोडफोड झाल्याने त्याने सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते रोशन खेताळ, स्वप्नील राऊत, गणेश साबळे यांच्यासह अन्य ६ ते ७ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९ (१), १८९ (२), १९०, १९१. १९२, १९६ (१), ३२४, ३५१ आणि ३५२ अन्वये गुन्हे दाखल केले आहे. या कारवाईमुळे मनसे कार्यकर्ते अधिकच चिडले आहेत.