‘काळजी करू नका, तुम्हाला औषधे मिळतील..’ या आश्वासक शब्दांनी चंद्रपूरच्या एका छोटय़ा गावातून आलेल्या फोंडे यांची काळजी मिटली.. मुंबईत ओळखीचे कोणीच नव्हते. एकुलत्या एक मुलावर होणाऱ्या मोठय़ा शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या औषधांसाठी पैसेही नव्हते आणि जेवणाचीही व्यवस्था नव्हती. शीव रुग्णालयाच्या सोशल वर्कर विभागात ‘संडे फ्रेंड्स’कडून मदत मिळेल असे समजल्यावर शोधाशोध करत फोंडे येथे आले आणि चक्क परमेश्वर भेटल्याचेच त्यांना भासले. औषधे तर मिळालीच, शिवाय जेवणाचीही व्यवस्था झाली..
शीव रुग्णालयातील अशा हजारो गरजू रुग्णांना औषधोपचाराचा आधार ‘संडे फ्रेंड्स’ रूपाने मिळत आहे. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेने निरपेक्षपणे व प्रसिद्धीचा कोणताही झोत स्वत:वर पडणार नाही याची काळजी घेतच तीस वर्षे महापालिकेच्या शीव रुग्णालयात हजारो गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करणारा सेवाभावाचा आगळा आविष्कार ‘संडे फ्रेंड्स’ नावाने येथे निरपेक्षपणे काम करत आहे. या गटाचा कार्यकर्ता स्वत:ची ओळख सांगत नाही. ‘संडे फ्रेंड्स’ हीच प्रत्येकाची ओळख..
सायनमध्ये राहणाऱ्या काही तरुणांनी १९८४ साली एकत्र येऊन शीव रुग्णालय परिसरात रविवारी रस्त्यावरील लोकांना जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला. पुढे रुग्णालयातील रुग्णांना व नातेवाईकांना जेवण, फळे देण्याचे काम सुरू झाले. गुजराती, जैन, मारवाडी अशा वेगवेगळ्या समाजांतील असलेल्या या तरुणांचे ध्येय एकच होते- मानव सेवा! कोणत्याही परिस्थितीत ट्रस्ट स्थापन करायचा नाही आणि कोणतीही पदे घ्यायची नाहीत, आपले नाव प्रसिद्ध होऊ द्यायचे नाही ही या तरुणांनी तेव्हा स्वत:वर घातलेली बंधने आजही तंतोतंत पाळली जाताहेत.
दर रविवारी रुग्ण व नातेवाईकांना जेवण देणे पुरेसे नाही, रुग्णांना महागडय़ा औषधांचीही गरज असते, हे लक्षात आल्यावर शीव रुग्णालयातील रुग्णांना स्वखर्चाने विकत घेतलेली औषधे पन्नास ते सत्तर टक्के स्वस्त दराने औषधे देण्यास सुरुवात झाली.
 ‘संडे फ्रेंड्स’चे काम पाहून रुग्णालयाच्या तत्कालीन अधिष्ठात्यांनी त्यांना आवारातच सोशल वर्क विभागात एक जागा दिली. या जागेत दररोज ‘संडे फ्रेंड्स’चे चार ते पाच सदस्य सकाळी साडेनऊ ते एक वाजेपर्यंत थांबतात, रुग्णांना मदत करतात, शासनाच्या योजनांमधून रुग्णांना मिळणाऱ्या मदतीबाबत मार्गदर्शनही करतात. गरजूंना प्रसंगी मोफत औषधे दिली जातात. गेल्या तीस वर्षांत ४० हून अधिक रक्तदान शिबिरे आयोजित करून संस्थेने हजारो पिशव्या रक्त गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिले आहे.
शीव रुग्णालयात अपघातग्रस्त जखमी अथवा भाजलेले रुग्ण येण्याचे प्रमाण मोठे आहे. शीव रुग्णालयात त्वचारोपण कक्ष आहे. मात्र यासाठी त्वचा मिळणे गरजचे आहे. नेमकी ही गरज ओळखून आठ वर्षांपूर्वी त्वचादानाचा यज्ञ संडे फ्रेंड्सने सुरू केला आणि आतापर्यंत ७८० हून अधिक मृत व्यक्तींची त्वचा मिळवून हजारो रुग्णांच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम ‘संडे फ्रेंड्स’ने केले आहे. सुमारे शंभराहून अधिक सेवाभावी व्यक्ती प्रसिद्धीपासून दूर राहण्याची दक्षता घेत संडे फ्रेंड्स म्हणून काम करत आहेत.  
समाजात अशी सेवाभावी माणसे असतील तर या देशाला काहीच कमी पडणार नाही!
डॉ. अविनाश सुपे, शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता