मुंबई : खेळताना गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे चालणेही मुश्किल झाले आणि ४७ वर्षीय सुनीत कोपरा क्रिकेटपासून दुरावले. मात्र डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य फिजिओथेरपी, जिद्द, चिकाटीच्या जोरावर सुनीत यांनी दुखण्यावर मात करीत राष्ट्रीय सायकलस्वार म्हणून उदयास आले. कोपरा यांनी ८९ तासांत १२०० किमीचे अंतर पूर्ण करताना आता काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर सायकलवरून पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यामुळे जिद्द, चिकाटी आणि मेहनत यातून एखादी व्यक्ती फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले.

ठाणे येथे राहणारे सुनीत कोपरा एका आयटी कंपनीमध्ये वरिष्ठ विक्री व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर ते जिल्हा पातळीवर क्रिकेट खेळत होते. २०१९-२० मध्ये क्रिकेट खेळताना त्यांचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना प्रचंड वेदना होत होत्या. त्यांना नीट चालणेही शक्य होत नव्हते. तीन महिने उपचार करूनही आराम मिळत नसल्याने ते घराजवळच असलेल्या रुग्णालयातील अस्थिव्यंगशल्य चिकित्सक डॉ. बाबासाहेब चव्हाण यांच्याकडे उपचारासाठी गेले. विविध तपासण्या केल्यावर काेपरा यांचे लिगामेंट फाटल्याचे डॉ. चव्हाण यांच्या लक्षात आले.

लिगामेंट फाटल्यावर गुडघा अस्थिर होऊन कालांतराने सांध्याला आणखी नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्यांनी तातडीने गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. गुडघ्याच्या सांध्याची स्थिरता आणि कार्य पुनर्संचयित करण्यासाठी, अँटेरियर क्रूसिएट लिगामेंट (एसीएल) शस्त्रक्रिया हा महत्त्वाचा पर्याय आहे. शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यानी फिजिओथेरपी आणि व्यायाम सुरू केल्यावर काेपरा चालू लागले. पूर्णपणे बरे होण्यासाठी डॉ. चव्हाण यांनी कोपरा यांना सायकल चालवणे किंवा पोहण्याचा सल्ला दिला. करोनामध्ये स्विमिंग पूल बंद असल्याने कोपरा यांनी सायकल चालविण्याचा पर्याय निवडला.

सुरुवातीला ३० मिनिटांत ५ किमी, त्यानंतर ६० मिनिटांत १० किमी असे हळूहळू अंतर वाढवले. ४ महिन्यांत सायकल चालविणे आणि योग्य आहाराद्वारे १८ किलो वजन कमी करून ते १०० किमीपर्यंत सायकल चालवू लागले. त्यानंतर ९.५ तासांत २०० किमी, १४ तासांत ३०० किमी, २४ तासांत ४०० किमी, ७२ तासांत १००० किमी आणि ८९ तासांत १२०० किमी अंतर सायकल चालवू लागले. त्यातूनच काेपरा यांची राष्ट्रीय स्तरावर सायकलस्वार म्हणून ओळख निर्माण झाली.एसीएल शस्त्रक्रियेमुळे खेळाडू पुन्हा खेळू शकत असले तरी त्यासाठी अनेक तास कसरत, पुनर्वसन, प्रबळ इच्छाशक्ती आणि समर्पणाबरोबरच डॉक्टरांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते. असे सुनीत कोपरा यांनी सांगितले.

भारतात दरवर्षी सव्वा लाख शस्त्रक्रिया

दरवर्षी जागतिक स्तरावर चार लाखांहून अधिक एसीएल शस्त्रक्रिया होतात. भारतामध्येही अंदाजे १ लाख २५ हजार शस्त्रक्रिया होतात. भारतात शस्त्रक्रियेच्या यशाचा दर ९० ते ९५ टक्के आहे.