मुंबई : मराठी नामफलक न लावणाऱ्या दुकानांवरील कारवाई मुंबई महापालिकेतर्फे संथ गतीने सुरू असतानाच दुकानावर मराठी फलक नाही म्हणून कारवाई करण्यास किंवा दंड वसुली करण्यास न्यायालयाने १८ डिसेंबपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे मंदावलेली कारवाई आता न्यायालयीन प्रक्रियेत रखडणार आहे.
हेही वाचा >>> आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी…”
वारंवार मुदतवाढ देऊनही मराठी नामफलक लावण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या दुकानांवर ऑक्टोबरपासून महापालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली होती. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून महापालिकेने अशा दुकानांना सात दिवसांच्या नोटिसा देण्यास सुरुवात केली. मात्र हा कालावधी उलटल्यानंतरही प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली नव्हती. पहिल्या आठवडय़ात महापालिकेने तीन हजार दुकानदारांना नोटीस पाठवली होती. मात्र त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून ही कारवाई थंडावली आहे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने या कारवाईलाच स्थगिती दिली आहे. मराठी फलकांच्या सक्तीविरोधात ‘फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स’ने आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यानंतर संघटनेने सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती. मात्र महापालिकेने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. ही मुदत ३० सप्टेंबरला संपली. मात्र मराठी फलकांची आणि विशिष्ट आकाराच्या अक्षरांची सक्ती असू नये, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा विचार व्हावा अशी भूमिका घेऊन दुकानदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.