मुंबई : पवई तलावात मोठया प्रमाणात मगरींचा अधिवास असून अधूनमधून मगरी तलावाबाहेर येऊन मुक्तसंचार करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी परिसरात मगरीचे पिल्लू दिसले होते. यामुळे सध्या तलावातील मगरींचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी होत असून यापूर्वी पालिकेला पुन्हा एकदा पवई तलाव संवर्धनाचा मुद्दा यामुळे चर्चेत आला आहे.
काही दिवसांपूर्वी आयआयटी मुंबईच्या वसतिगृह क्रमांक १७ च्या मागे मगरीचे पिल्लू दिसल्याची ध्वनिचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आली आहे. या ध्वनिचित्रफितीत मगरीचे लहान पिल्लू मुक्तपणे संचार करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तलावात मगरींची संख्या वाढली असण्याची दाट शक्यता स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. यामुळे पुन्हा एकदा तलावातील मगरींचे सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी आता केली जात आहे. दरम्यान, या अगोदर मुंबई महानगरपालिकेने जुलै २०२२ मध्ये केलेल्या गणतीमध्ये पवई तलावात साधारण १८ प्रौढ मगरी असल्याचे निदर्शनास आले होते. आयआयटी, मुंबई, रेनिसंस हॉटेल, पवई उद्यानाजवळ पवई तलावात मगरींचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. तसेच तलावातील छोट्या उंचवट्यावर अधूनमधून मगरींचे दर्शन घडते. पवई तलावातील मगरींचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदा ही गणना केली होती.एका पशु वैद्यकीय पथकामार्फत मगरींची गणती करण्यात आली होती. या मोजणी दरम्यान पवई तलावात १८ मगरी असल्याचे निदर्शनास आले.
यापूर्वीही पर्यावरणप्रेमींनी पालिकेला याबाबत पत्र लिहून पवई तलावाच्या संवर्धनाबाबत उपाययोजना राबविण्याची मागणी केली होती. याचबरोबर पालिका आणि वनविभागाने मिळून हे काम करणे गरजेचे असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. मात्र, यावर पालिकेकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे वनशक्तीचे संचालक स्टॅलिन डी यांनी सांगितले असून सध्याची परिस्थिती पाहता आतातरी पालिकेने याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. त्यामुळे पवई तलाव संवर्धनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, एकेकाळी मुंबईकर व पर्यटक पवई तलावाला भेट देत होते. मात्र आता हा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकला आहे. जलपर्णी, गाळ आणि सांडपाण्यामुळे तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली आहे.
यापूर्वीही मगरीची सुटका
मागील वर्षी पवई येथील मोरारजी नगर परिसरातील साकी विहार रस्त्याजवळील ५ फूट खोल खड्ड्यात सुमारे पाट फुटी मगर आढळूल आली होती. रेस्क्यूइंग असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर या प्राणी संघटनेचे कार्यकर्ते आणि विनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘मार्श’ प्रजातीच्या ४.६ फुटांच्या नर मगरीची सुटका केली होती.
तस्करीचा प्रयत्न
पवई तलावात मगरींचा अधिवास असून अनेकदा मोठ्या मगरी पवई तलावातून विहार तलावाकडे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या वर्षी आरोपीने तस्करी केलेले मगरीचे पिल्लू आयआयटी पवई परिसरात विक्रीसाठी आणले होते. मगरीच्या पिल्लाची विक्री करण्यासाठी या परिसरात येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आयआयटी पवईच्या प्रवेशद्वारासमोर जोगेश्वरी जोडरस्त्यावर वन विभागाने सापळा रचला होता. संशयास्पद व्यक्ती दिसताच वन विभागाच्या अदिकारी, कर्मचाऱ्याने त्याला ताब्यात घेतले होते. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मगरीचे पिल्लू सापडले होते.