अभिनेता परेश रावल, संकलक वामन भोसले, भरत जाधव मानकरी

राज्य सरकारतर्फे दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका सुषमा शिरोमणी आणि सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे. तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले यांना तर विशेष योगदान पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेता परेश रावल यांना घोषित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी पुरस्कारांची घोषणा केली. रविवारी, ३० मे रोजी वरळीतील नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया येथे होणाऱ्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये आणि सन्मानपत्र, तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप तीन लाख रुपये आणि सन्मानपत्र असे आहे. बालकलाकार म्हणून १९८५ साली ‘सोने की चिडीया’, ‘लाजवंती’ या चित्रपटांतून अभिनय क्षेत्रात पाऊ ल टाकणाऱ्या सुषमा शिरोमणी यांनी अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवला. अभिनयाच्या जोडीने चित्रपट, पटकथाकार, निर्मिती, दिग्दर्शन आणि वितरण अशा विविध विभागांत त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले.

शाहीर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली १९८५मध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’मधून कारकीर्दीचा नाटय़गणेशा करणारे अभिनेता भरत जाधव यांनी मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोव्यातील पाम्बुरपा या छोटय़ा गावातून थेट मुंबईमध्ये बॉम्बे टॉकीजपर्यंत आलेले आणि संकलक म्हणून आपल्या कार्याने वामन भोसले नावारुपाला आले. त्यांना १९७८ साली ‘इन्कार’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर हिंदी चित्रपट आणि गुजराती नाटक दोन्ही माध्यमांद्वारे चरित्र भूमिकांमधून नावारूपाला आलेल्या प्रसिद्ध अभिनेता परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.