इशारा देऊनही एसटी संप सुरूच, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आज १०८८ कर्मचाऱ्यांचं निलंबन

राज्य सरकारने आज (२९ नोव्हेंबर) कामावर हजर राहण्याचे आदेश देऊनही संप करणाऱ्या १०८८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर पगारवाढीचा निर्णय घेतला. तसेच कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर हजर होण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतरही काही कर्मचारी संघटनांनी एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर संप सुरूच ठेवला. यानंतर राज्य सरकारने या आंदोलक कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे निर्देश देत कारवाईचा इशारा दिला. मात्र, कर्मचारी आंदोलनावर ठाम राहिले. अखेर आज राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केलीय.

राज्य सरकारने आज (२९ नोव्हेंबर) कामावर हजर राहण्याचे आदेश देऊनही संप करणाऱ्या १०८८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. याशिवाय २५४ जणांची थेट सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतलाय. यासह आतापर्यंत सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ७७९ वर पोहचली आहे.

हेही वाचा : एसटी संपाबाबत जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्वीट, प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ३५० रुपये घेतल्याचा आरोप!

एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने काय घोषणा केली?

घरभाडे भत्ता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. पगारवाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच केली जावी, ही बाब देखील मान्य झाली आहे. या बाबी करारामध्ये होत्या. पण बेसिकचा विषय होता.

१ ते १० वर्ष श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी…

राज्य सरकारने निर्णय घेतलाय की जे कर्मचारी १ ते १० वर्ष या श्रेणीत आहेत, या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ठोक ५ हजारांची वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याचं मूळ वेतन १२ हजार ०८० रुपये होतं, त्याचं वेतन आता १७ हजार ३९५ झालं आहे. मूळ वेतन १७ हजार ०८० वरून २४ हजार ५८४ रुपये झालं आहे. त्यामुळे जवळपास ७ हजार २०० रुपयांची पगारवाढ पहिल्या श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांची झाली आहे. जवळपास ४१ टक्के एवढी ही वाढ असून एसटीच्या इतिहासातली ही सर्वात मोठी वाढ आहे.

१० ते २० वर्ष श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी…

१० ते २० वर्षांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ४ हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचा पूर्ण पगार २३ हजार ०४० होता तो आता २८ हजार ८०० रुपये झाला आहे.

२० वर्षांहून अधिक श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी…

२० वर्षांहून अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात २ हजार ५०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ वेतन २६ हजार आणि स्थूल वेतन ३७ हजार ४४० होतं, त्यांचं वेतन आता ४१ हजार ०४० झालं आहे. ज्याचं मूळ वेतन ३७ हजार होतं आणि स्थूल वेतन ५३ हजार २८० होतं, त्यांना २५०० रुपयांची वाढ केल्यामुळे मूळ वेतन ३९ हजार ५०० तर स्थूल वेतन ५६ हजार ८८० होईल.

कामगारांचे दोन प्रकार होते. अतिशय कमी पगार असल्याची बाब समोर आली. पण चांगले पगार असणाऱ्या कामगारांना देखील पगार वाढ देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने या गोष्टी दिल्या आहेत. आज दिवसभर झालेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. ही सर्व कामगारांना मिळालेली चांगली पगारवाढ आहे.

आता पगार १० तारखेच्या आतच होणार

गेल्या वर्षी करोनामुळे एसटी आर्थिक नुकसानीमध्ये होती. अशा स्थितीत देखील राज्य सरकारने एसटीला २ हजार ७०० कोटींची मदत पगारासाठी केली होती. पण काही कारणास्तव त्यांचे पगार उशिरा होत होते. यादरम्यान काही कामगारांनी आर्थिक समस्येमुळे आत्महत्या केल्या. म्हणून राज्य शासनाने त्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आधी होईल, ही हमी घेतलेली आहे. त्यामुळे एसटीच्या कामगारांचा पगार कधीही १० तारखेच्या पुढे जाणार नाही.

कर्मचाऱ्यांसाठी इन्सेंटिव्हची घोषणा

आजच्या चर्चेत कामगारांचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे, यासाठी इन्सेन्टिवची योजना जाहीर करतोय. एसटीचं उत्पन्न वाढल्यावर ते उत्पन्न वाढवण्यासाठी ड्रायव्हर, कंडक्टरनं चांगलं काम केलं असेल, त्यांना इन्सेन्टिव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आत्महत्या केलेल्या कामगारांचा शासन सहानुभूतिपूर्वक विचार करेल.

ड्युटीवर हजर राहिल्यास पगार मिळणार

हा संप झाला, त्यामागे चांगली वेतनवाढ आणि पगाराची हमी मिळावी या दोन्ही मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. काही अटी कामगारांना जाचक वाटत होत्या. त्यातली एक म्हणजे जे कामगार कामावर येतात, पण त्यांना ड्युटी नसल्यामुळे त्याची रजा भरून घेतली जाते. पण यापुढे, जो कामगार कामावर हजेरी लावेल, त्याला त्या दिवसाचा पगार मिळेल. याव्यतिरिक्त जाचक अटी असतील, तर त्याचा विचार शासन करेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Suspension and service termination action against protesting st bus employee pbs

ताज्या बातम्या