प्रदुषण कमी करणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी विजेवर धावणाऱ्या वाहनांच्या वापराला राज्य सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत असून या वाहनांच्या खरेदीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मुंबईतील ताडदेव आणि अंधेरी आरटीओत विजेवर धावणाऱ्या वाहनांची सर्वाधिक नोंद झाली आहे. जानेवारी ते जून या महिन्यात ताडदेवमध्ये १,६१४ आणि अंधेरीत १ हजार ४२९ वाहनांची नोंदणी झाली असून यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या अधिक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२५ पर्यंत प्रत्येक शहरात चार्जिंग केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट –

पारंपारिक इंधनाचा तुटवडा आणि प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने विजेवरील वाहनांबाबत धोरण जाहीर केले आहे. याला गती देण्यासाठी राज्य सरकारनेही आपले धोरण जाहीर केले. यामध्ये विजेवरील वाहनांच्या मागणीत वाढ व्हावी, म्हणून त्यांच्या खरेदीवर प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. विजेवर धावणाऱ्या दुचाकीसाठी कमाल दहा हजार रुपये, मोटारगाडीसाठी दीड लाख रुपये, बससाठी वीस लाख रुपये, प्रवासी रिक्षा आणि मालवाहू रिक्षासाठी २० हजार रुपये यासह अन्य वाहनांसाठीही सवलती देऊ केल्या. याशिवाय विजेवर दावणाऱ्या वाहन धोरणाच्या मसुद्यात समाविष्ट शहरांमध्ये एप्रिल २०२२ पासून नोंदणी होणारी राज्य सरकारची सर्व वाहने विजेवर धावणारी असतील. २०२५ पर्यंत प्रत्येक शहरात चार्जिंग केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

चार आरटीओत ५ हजार ७५९ वीजेवरील वाहनांची नोंद –

एकंदरीतच केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण पाहता काहींचा कल विजेवरील वाहन खरेदीकडे असल्याचे दिसते. मुंबईतही वीजेवरील वाहनांना खरेदीदार मिळत आहेत. जानेवारी २०२२ पासून ते आतापर्यंत मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली या चार आरटीओत ५ हजार ७५९ वीजेवरील वाहनांची नोंद झाली आहे.

यामध्ये ताडदेव आरटीओत १ हजार ६१४ वाहनांचा समावेश आहे. या आरटीओत जानेवारीत १५२ विजेवरील वाहनांची नोंद झाली होती. जूनमध्ये ही संख्या १६७ होती. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ अंधेरी आरटीओतही एकूण १,४२९ वीजेवरील वाहनांची नोंदणी झाली असून जूनमध्ये २३० वाहनांची खरेदी झाली आहे. जानेवारीत हीच संख्या १८६ होती. वडाळा आरटीओतही एकूण १ हजार ३२० आणि बोरिवलीत १ हजार ३९६ विजेवरील नवीन वाहनांची नोंद झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taddev and andheri in the forefront in purchasing electric vehicles mumbai print news msr
First published on: 23-06-2022 at 14:01 IST