कंपनीकडून रेल्वे बोर्डाला प्रस्ताव; ४९३ किमीचे अंतर पाच तासांत

मुंबई-अहमदाबाद यांदरम्यान बुलेट ट्रेन होण्यास अद्याप भरपूर वेळ असला, तरी या दोन शहरांदरम्यानचा प्रवास केवळ पाच तासांवर येण्याची शक्यता आहे. सध्या या दोन शहरांमधील ४९३ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सर्वात वेगवान गाडी शताब्दी एक्स्प्रेस सहा तास २० मिनिटे एवढा वेळ घेते. ही गाडी १३० किमी प्रतितास एवढय़ा वेगाने धावते. हा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी स्पेनच्या टॅल्गो कंपनीने आपली प्रतितास १५० किमी वेगाने धावणारी गाडी या मार्गावर चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाच्या शक्यता तपासण्यासाठी समितीची स्थापना केली आहे.

सध्या शताब्दी एक्स्प्रेससाठी जे तिकीट दर आकारले जातात तेवढय़ाच तिकीट दरांमध्ये टॅल्गो कंपनी ही सेवा देण्यास तयार आहे. असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याआधी टॅल्गो कंपनीच्या वेगवान गाडीची चाचणी मुंबई-दिल्ली या मार्गावर झाली आहे. ही चाचणी यशस्वी ठरली असली, तरी या मार्गावर दर दिवशी गाडी चालवण्यासाठी किमान दोन गाडय़ांची आवश्यकता आहे. तसेच या गाडय़ांच्या देखभाल दुरुस्तीसाठी दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये व्यवस्था करावी लागेल. दिल्ली ते मुंबई या १३८४ किमीच्या अंतराऐवजी ही गाडी छोटय़ा अंतरांमधील दोन शहरांदरम्यान चालवल्यास एकाच शहरात देखभाल दुरुस्तीची यंत्रणा उभारता येणे शक्य आहे, असे सूत्रांनी सांगितले.

रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी समिती नेमली आहे. मुंबई-अहमदाबाद या दोन शहरांप्रमाणेच ही गाडी दिल्ली-अमृतसर, दिल्ली-आग्रा अशा शहरांदरम्यान चालवण्याची शक्यताही ही समिती तपासून पाहणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

  • सध्या टॅल्गोने चार गाडय़ा भाडेतत्त्वावर देण्याची तयारी दर्शवली आहे. या गाडय़ांच्या तिकिटातून मिळणारे उत्पन्न कंपनीला जाणार असून गाडय़ांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांची असेल, असेही सूत्रांनी सांगितले.
  • या गाडय़ा ताशी २०० किमी वेगाने धावू शकतात. या कंपनीचे नऊ डबे २०१६मध्ये मुंबईत दाखल झाले असून दिल्ली-मुंबई या मार्गावर त्यांच्या ताशी १५० किमी वेगाने चाचण्याही झाल्या आहेत. या गाडय़ांचे डबे वळणावरती झुकत असल्याने गाडीचा तोल सांभाळला जातो. तसेच त्यामुळे वळणावरही गाडी इतर गाडय़ांच्या तुलनेत २० टक्के जास्त वेगाने धावू शकते.