महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलणं म्हणजे एकटय़ानेच बॅडमिंटन खेळण्यासारखे आहे. एखादा विषय आपण तळमळीने त्यांच्याकडे मांडावा व उपाय सांगावा तर त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया नसते, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी लगावला.
मुख्यमंत्र्यांकडे यापूर्वीही मुंबईचे रस्ते आणि कंत्राटदारांच्या टक्केवारीच्या राजकारणासह अनेक विषय मांडले होते. आता पुन्हा एकदा मराठी माणसांनाच टॅक्सी परमिट देण्याचा विषय आपण मांडणार असून यावेळी मुख्यमंत्री काय करतात ते पाहू असेही राज म्हणाले. राज यांनी मुंबै बँकेच्या मुख्यालयाला बुधवारी भेट दिली. त्यावेळी बोलताना बँकेत सर्वपक्षीय लोक असूनही बँकेचा कारभार चांगला चालू शकतो असे सांगताना राज्याचा कारभार काँग्रेस-राष्ट्रवादीला का चांगला चालवता येत नाही, असा सवाल केला. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे एक टोक तर शरद पवार कधी काय बोलतील याचा नेम नाही. ते जे काही बोलतात ते सात-आठ महिन्यानंतर कळतं, असा टोमणा त्यांनी मारला.
आगामी काळात रिक्षा व टॅक्सीची परमिट देण्यात येणार असून ती केवळ मराठी बेरोजगार तरुणांनाच मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण आग्रह धरणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. न्यायालयाने कितीही आदेश दिले तरी जोपर्यंत सरकार व पालिकेत कंत्राटदारांचे राज्य आहे, तोपर्यंत रस्त्यांची परिस्थिती सुधारणे शक्य नसल्याचे राज यांनी सांगितले. रस्त्यांचे कंत्राटदार आणि राजकारणी यांची हातमिळवणीच रस्त्यांना खड्डय़ांत लोटण्याचे काम करते. रस्त्यांसाठी निविदा निघतात हे मला मान्य आहे, परंतु खड्डय़ांसाठी ‘टेंडर’ कशी निघू शकतात, असा सवाल करून राज म्हणाले की, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आजही चांगला आहे. कारण मोठय़ा लोकांनी हे काम केले. त्यामुळे अशाचप्रकारे राज्यातील व मुंबईतील रस्त्यांचे काम मोठय़ा लोकांना मिळाले तरच चांगले रस्ते होऊ शकतील. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक देशात पाऊस पडतो, पंरतु तेथील रस्ते चांगले असतात. अगदी मागसलेल्या देशांतील रस्तेही मुंबईपेक्षा चांगले असतात, असा टोला त्यांनी शिवसेना-भाजपला लगावला.
संग्रहित लेख, दिनांक 15th Aug 2013 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्र्यांशी बोलणं म्हणजे एकटय़ानेच बॅडमिंटन खेळण्यासारखे – राज ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलणं म्हणजे एकटय़ानेच बॅडमिंटन खेळण्यासारखे आहे.
First published on: 15-08-2013 at 03:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talking with chief minsiter like playing bedminton alone raj thackeray