मुंबई : देशाच्या कोणत्याही भागामध्ये राहात असलेल्या कर्करोग रुग्णाला टाटा रुग्णालयासारखे दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी टाटा रुग्णालय संलग्नित ‘नव्या केअर’ संस्थेने ‘अर्थशॉट’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या कर्करोग रुग्णांवर एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परवडणारे उपचार सहज उपलब्ध होणार आहेत. ‘अर्थशॉट’ ही एआय आधारित सुविधा तामिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम येथे सुरू करण्यात आली असून, आता महाराष्ट्रामध्ये ही सुविधा सुरू करण्यात येत आहे.
टाटा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या नव्या केअर या संस्थेने देशभरातील प्रादेशिक कर्करोग रुग्णालयांशी संपर्क करत कर्करोग रुग्णांना एआय तंत्रज्ञानावर आधारित परवडणारे कर्करोग उपचार उपलब्ध करण्यासाठी पावले उचलली आहेत. कर्करोग रुग्णांना एआय आधारित उपचार मिळावेत यासाठी नव्या केअरने ‘अर्थशॉट’ ही बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली डॉक्टरांना नॅशनल कॅन्सर ग्रिडच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रुग्णाच्या आजारानुसार वैयक्तिक उपचार करण्याची सुविधा देते. ही प्रणाली सध्या तामिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम येथे कार्यरत असून आता महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये अवघ्या दोन महिन्यांत या उपक्रमातून एक हजारांहून अधिक अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना लाभ झाला आहे. वर्षाअखेरपर्यंत तीन हजार रुग्णांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी नव्याचे तज्ज्ञ उपचार मार्गदर्शन पूर्णपणे मोफत आहे. नव्याच्या माध्यमातून उपचारासाठी रुग्णांना http://www.navya.care च्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.
दरवर्षी भारतात सुमारे १४ लाख नवीन कर्करोग रुग्णांची नाेंद होते. यातील १ लाख २० हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नाेंद ही महाराष्ट्रात होते. ग्रामीण भागातील बहुतेक कर्करोग रुग्णांना टाटा रुग्णालयामध्ये किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचार केंद्रांपासून दूर राहावे लागते, अशा रुग्णांनासाठी एआय आधारित उपचार वरदान ठरत आहे. नव्या केअरच्या अर्थशॉट उपक्रमामुळे रुग्णांच्या उपचार भेटी जवळपास अर्ध्या झाल्याने रुग्णांचा प्रवास खर्च व मानसिक ताण कमी होण्यास मदत होत असल्याचे नव्या केअरचे सहसंस्थापक डॉ. नरेश रामराजन यांनी सांगितले.
या रुग्णांना मिळणार मोफत उपचार
दारिद्रय रेषेखाली रेशन कार्ड, २.५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न प्रमाणपत्र किंवा सरकारी रुग्णालयातील प्रवेशपत्र असलेल्या रुग्णांना अर्थशॉटच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत सेवा पुरविण्यात येत आहे.
