मुंबई : कर्करोग रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावेत यासाठी टाटा रुग्णालयाच्या खारघरमधील ॲक्ट्रॅक येथे सुरू करण्यात आलेल्या प्रोटॉन उपचार केंद्रामध्ये १५ ऑगस्ट २०२३ रोजी पहिल्या रुग्णावर उपचार करण्यात आले. त्यानंतर मागील दोन वर्षांमध्ये तब्बल ५४१ कर्करोग रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून हे केंद्र रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. उपचार करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण सर्वसामान्य असून, त्यातील २७ टक्के रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ मे २०२३ रोजी ॲक्ट्रॅक्टमधील प्रोटॉन उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मात्र त्यानंतर केंद्रातील काही महत्त्वाच्या प्रक्रिया व रुग्णाची निवड करून उपचार सुरू करण्यासाठी १५ ऑगस्ट उजाडला. १५ ऑगस्ट २०२३ रोजी या केंद्रामध्ये पहिल्या रुग्णावर उपचार करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल ५४१ रुग्णांवर या पद्धतीने यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. पहिल्या वर्षामध्ये या केंद्रामध्ये अवघ्या १४७ रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. या उपचार पद्धतीअंतर्गत उपचार केलेल्यापैकी ६५ टक्के रुग्ण सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्यातील २७ टक्के म्हणजे १३६ रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले आहेत. या उपचारासाठीचा खर्च रुग्णालयाचा ‘रुग्ण कल्याण निधी’ किंवा कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व या उपक्रमांद्वारे उभारलेल्या निधीतून करण्यात आला आहे.

उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण

उपचार घेतलेल्या रुग्णांपैकी ३८ टक्के रुग्णांच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेत (सीएनएस) ट्यूमर होता. त्याखालोखाल हाडांचा ट्यूमर असलेल्या रुग्णांची संख्या २३ टक्के, डोके आणि मान येथे ट्यूमर असलेल्या रुग्णांची संख्या १९ टक्के, लहान मुलांमध्ये ट्युमर असलेल्या रुग्णांची संख्या १६ टक्के इतकी आहे. त्याचबरोबर स्त्रीरोग, स्तन कर्करोग, प्रोस्टेट आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्यूमर असलेल्या रुग्णांवरही उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती टाटा रुग्णालयातील प्रॉटोन उपचार केंद्राचे प्रमुख व शैक्षणिक उपसंचालक डॉ. सिद्धार्थ लस्कर यांनी दिली.

पश्चिम भारतातील रुग्णांना सर्वाधिक लाभ

प्रोटॉन उपचार पद्धतीचा लाभ देशातील सर्व भागातील रुग्णांना होत आहे. भारतामधील पश्चिमेकडील राज्यातील रुग्णांचे प्रमाण ५२ टक्के आहे. पूर्वेकडील राज्यांमधील रुग्णांचे प्रमाण २३ टक्के आहे. उत्तर भारतातील रुग्णांचे प्रमाण १४ टक्के, दक्षिण भारतातील रुग्णांचे प्रमाण ६ टक्के आणि मध्य भारतातील जिल्ह्यातील रुग्णांचे प्रमाण ४ टक्के आहे. परदेशातील रुग्णांचे उपचार घेण्याचे प्रमाण एक टक्का इतका आहे.

संशोधनावर भर

प्रौढ आणि मुलांमध्ये प्रोटॉन उपचार पद्धतीचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी व वैज्ञानिक पुरावे तयार करण्यासाठी टाटा रुग्णालयाने संशोधन प्रकल्प हाती घेतले आहेत. टाटा मेमोरियल सेंटर, भाभा अणू संशोधन केंद्रामधील शास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांच्या सहकार्याने तंत्रज्ञान आणि जीवशास्त्राचे मूल्यांकन करणारे संशोधन सुरू असल्याचे ॲक्ट्रॅक्टचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले.

ॲक्ट्रेक येथील प्रोटॉन उपचार केंद्र हे रुग्णालयातील सर्व गरजू रुग्णांना मोफत व अत्याधुनिक कर्करोग उपचार पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे. – डॉ. सुदीप गुप्ता, संचालक, टाटा रुग्णालय