मुंबई : तालाच्या नादाने भरलेल्या आणि भारलेल्या घरात त्यांचा जन्म झाला. तबल्यावर पडणारी थाप आणि त्यातून उमटणाऱ्या स्वरांनी अवघ्या विश्वाला जिंकून घेणाऱ्या उस्ताद अल्लारखाँ यांचे पुत्र म्हणून जन्माला येण्याचे भाग्य त्यांच्या भाळी होते. तितकाच प्रेमळ पाठीराखा त्यांना प्रख्यात तबलावादक थोरले बंधू झाकीर हुसैन यांच्या रुपाने लाभला. या दोघांनी दिलेला तालवारसा प्राणपणाने जपतानाच तालवादक म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या या किमयागाराशी तौफिक कुरेशी यांच्याशी संवादयोग ‘लोकसत्ता गप्पां’च्या माध्यमातून जुळून आला आहे.
ताल आणि नाद यांच्याशी लहानपणापासूनच गट्टी जमलेल्या तौफिक कुरेशी यांचा तालवादक म्हणून झालेला प्रवास तितका सहजसोपा नव्हता. घराणेशाहीचा वाद कलाक्षेत्रापासून राजकारणापर्यंत सगळीकडे डोके वर काढत असतो, तिथे तबलावादनात नावलौकिक कमावलेल्या दोन प्रतिभावंतांच्या संस्कारात वाढलेल्या तौफिक कुरेशी यांना स्वत:चा सूर कसा गवसला? तालवादक म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख कशी निर्माण केली? हे त्यांच्याचकडून ऐकण्याची संधी देणारा ‘लोकसत्ता गप्पा’ हा कार्यक्रम शनिवारी, ५ जुलैला होणार आहे. तौफिक कुरेशी यांचा कलाप्रवास, त्यांच्या अब्बाजींच्या आठवणी आणि झाकीरभाईंकडून मिळालेले प्रेम या सगळ्यांविषयी त्यांना बोलते करण्याची धुरा प्रसिद्ध लेखक – गायक आणि संगीत अभ्यासक डॉ. आशुतोष जावडेकर सांभाळणार आहेत.
अब्बाजींची तबल्यावर थिरकणारी बोटे आणि त्यातून निर्माण होणारा नाद, घराशेजारी असलेल्या दर्ग्यात वाजणाऱ्या नगाऱ्याचा नाद, झाकीरभाईंबरोबर मैफिलीत साथसंगत करताना, शास्त्रीय संगीत कार्यक्रमांत रमताना तबल्याबरोबरच अनेक तालवाद्यांचा नाद त्यांच्या कानावर पडत गेला. या तालवाद्यांशी त्यांचा हृद्य संवाद सुरू झाला आणि तबल्याबरोबरच ढोलक, पखवाज ही पारंपरिक भारतीय वाद्ये, जेम्बे – बोंगो – ड्रम यांसारखी परदेशी वाद्ये वाजवायला त्यांनी सुरुवात केली. एकलव्याप्रमाणे स्वत:च तालवाद्ये वाजवण्याचा प्रयास आणि रियाझ करत त्यावर प्रभुत्व मिळवणाऱ्या तौफिक कुरेशी यांचा कलाप्रवास प्रत्येकाला निश्चित प्रेरणादायी वाटेल असा आहे.
कलेचा भक्कम वारसा पाठीशी असला म्हणजे यश मिळते असे नाही, त्या वारशाची जाण ठेवून स्वत:तील कलाकाराचा शोध घेत अभ्यासप्रयत्नाने तो कसा घडवला जातो, याचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या तौफिक कुरेशी यांच्याबरोबरचा हा ‘लोकसत्ता गप्पा’ योग म्हणूनच चुकवू नये असा आहे.
शनिवारी, ५ जुलैला कार्यक्रम
तौफिक कुरेशी यांच्याशी संवादयोग साधणारा ‘लोकसत्ता गप्पा’ हा कार्यक्रम शनिवारी, ५ जुलैला होणार आहे. तौफिक कुरेशी यांचा कलाप्रवास, त्यांच्या अब्बाजींच्या आठवणी आणि झाकीरभाईंकडून मिळालेले प्रेम या सगळ्यांविषयी त्यांना बोलते करण्याची धुरा प्रसिद्ध लेखक – गायक आणि संगीत अभ्यासक डॉ. आशुतोष जावडेकर सांभाळणार आहेत.
प्रायोजक
पॉवर्ड बाय : व्हि. एम. ज्वेलर्स