मुंबई : टॅक्सीच्या किमान भाडय़ात तीन रुपयांनी, तर रिक्षा भाडे दोन रुपयांनी वाढविण्यास शुक्रवारी तत्त्वत: मान्यता देण्यात आली. ही भाडेवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रिक्षा, टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींची शुक्रवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाडेवाढीसंदर्भात चर्चा करण्यात आली. अपर मुख्य सचिव (परिवहन) आशिष कुमार सिंह यांचा अतिरिक्त कार्यभार असलेले प्रधान सचिव संजीव जयस्वाल (पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग) हेही उपस्थित होते. बैठकीत भाडेवाढीला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा >>> रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ : प्रवाशांच्या सवलतींकडे मात्र दुर्लक्ष; खटुआ समितीच्या शिफारसींना बगल

आता टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपयांवरून २८ रुपये, रिक्षाचे भाडे २१ रुपयांवरून २३ रुपये होणार आहे. मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून (एमएमआरटीए) भाडेवाढीला मंजुरी देण्यात येते. त्यामुळे तत्त्वत: मंजुरी मिळाल्यानंतर ‘एमएमआरटीए’ भाडेवाढीला अंतिम मंजुरी देणार आहे. पुढील आठवडय़ात भाडेवाढीसंदर्भात ‘एमएमआरटीए’ची बैठक होणार असल्याची माहिती परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

संप टळला..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीएनजी दरवाढीमुळे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने टॅक्सीच्या भाडय़ात किमान दहा रुपये वाढ करण्याची मागणी केली होती. तर, रिक्षा संघटनांनी किमान पाच रुपये वाढ देण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी २६ सप्टेंबरपासून संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र भाडेवाढीला तत्त्वत: मिळालेली मंजुरी आणि भाडेवाढ १ ऑक्टोबरपासून लागू करण्याबाबत मिळालेले आश्वासन यामुळे संप मागे घेण्यात येत असल्याचे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी जाहीर केले.