आयत्या वेळच्या सरकारी संदेशांचा मारा
रात्री दहा वाजता अचानक व्हॉट्सअॅप संदेशाची धून वाजते.. ‘उद्या सकाळी १० वाजता प्रशिक्षणासाठी केंद्रावर पोहचा..’ असा संदेश असतो. असे एक ना अनेक आयत्यावेळचे संदेश सध्या शिक्षकांसाठी तापदायक ठरू लागले आहेत. इतकेच नव्हे तर एखाद्या शिक्षकाने संदेश वेळेत पाहिला नाही तर याला जबाबदार कोण असा प्रश्नही शिक्षकांना पडू लागला आहे. यामुळे पूर्वी शाळेच्या काळात मोबाइलपासून दूर असणारे शिक्षक आता त्या कालावधीतही ऑनलाइन दिसू लागले आहेत.
शिक्षकांपर्यंत सरकारी निरोप पोहचावेत यासाठी अनेक विभागांतील शिक्षणाधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅप समूह सुरू केले आहेत. अशाप्रकारचे समूह करावेत अशा तोंडी सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तालुका स्तरावर एक, जिल्हास्तरावर एक असे विविध व्हॉट्सअॅप समूह तयार करण्यात आले होते. या समुहांमध्ये शिक्षण विभागांतील अधिकाऱ्यांकडून अनेक महत्त्वपूर्ण संदेश येत असतात. पण ग्रामीण भागातील अनेक शिक्षक अनेकदा कव्हरेजच्या बाहेर असतात तर अनेक शिक्षकांचे डेटा पॅक संपलेले असते. अशावेळी त्यांच्यापर्यंत संदेश पोहचत नाहीत आणि अनेकदा ते माहितीपासून दूर राहतात असा प्रश्न एका शिक्षकाने उपस्थित केला आहे. अनेकदा उद्याच्या कार्यक्रमाची माहिती आदल्या रात्री येते आणि ती सर्वांपर्यंत पोहचत नाही. मग कार्यक्रमांना उपस्थित राहणे शिक्षकांना जमत नाही. नंतर जेव्हा शिक्षकांना त्या कार्यक्रमासंदर्भात समजते तेव्हा मात्र शिक्षकांना कारवाईची भीती वाटते. याचबरोबर अनेकदा याचा गैरवापर झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षांत पार पडलेल्या निवडणुकांनंतर निवडणुकांसाठी काम केलेल्या शिक्षकांना दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे परिपत्रक व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले होते. त्यानंतर काही शिक्षकांनी चौकशी केल्यावर ते परिपत्रक चुकीचे असल्याचे उघड झाले. अशावेळी कोणाला जबाबदार धरणार असा प्रश्नही शिक्षक विचारत आहेत. तसेच अशा संदेश देण्याच्या अशा प्रक्रियेमुळे स्मार्टफोन नसलेले शिक्षक यापासून दूर राहतात किंवा त्यांना पर्यायाने स्मार्टफोन घेण्याची सक्ती येऊ शकते असा आक्षेपही काही शिक्षकांनी नोंदविला आहे. त्यातच राज्यातील एका विभागात शिक्षकांच्या व्हॉट्सअप नंबर्स आणि अॅडमिनचे नाव आदी तपशील मागवल्यामुळे हा गोंधळ अधिकच वाढला आहे.
सध्या संदेश पोहचवण्यासाठी व्हॉट्सअपसारख्या माध्यमाचा वापर केला जातो. पण त्यावरील माहिती ही विश्वासार्ह असेलच असे नाही. यामुळे या माध्यमाचा वापर हुशारीने करावा. शासनातर्फे व्हॉट्सअॅपद्वारे संदेश पाठवण्याचा कोणताही लेखी आदेश देण्यात आलेला नाही. यामुळे एखादा निरोप पोहचवण्यासाठी सध्या वापरत असलेल्या अधिकृत माध्यमांचा वापर होणेही गरजेचे आहे. याचबरोबर शिक्षकांचे व्हॉट्सअॅपनंबर्स आणि समुहांची माहिती मागवण्याचा कोणताही आदेश शिक्षण विभागाने दिला नसून तो विभागीय पातळीवर काढला गेला असल्याची शक्यता आहे.
– नंदकुमार, सचिव,
शालेय शिक्षण विभाग