२५ टक्के कोटय़ातील जागा भरण्यासाठीची ऑनलाइन प्रवेशपद्धती सदोष; अनेक तांत्रिक त्रुटींमुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

बालकांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के जागा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा नियम दिलासा देणारा असला तरी, यासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी विद्यार्थ्यांना अडचणीच्या ठरू लागल्या आहेत. प्रक्रियेतील या दोषांमुळेच हजारो विद्यार्थी पहिल्या प्रवेश फेरीला मुकल्यानंतर आता मुंबईतील सात हजार विद्यार्थ्यांकरिता प्रवेशाची अतिरिक्त फेरी राबवली जाणार आहे. परंतु, ऑनलाइन प्रक्रियेत सुधारणा करण्यात न आल्यामुळे किती विद्यार्थ्यांना या फेरीचा फायदा होईल, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

मुंबईतील खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांकरिता मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. मात्र घराजवळील शाळा गुगल मॅपवर न दिसणे, घराजवळील शाळांमध्ये रिक्त जागा असूनही लांबच्या शाळांना प्रवेश देणे, पालकांना प्रवेशाबाबतचे संदेश न मिळणे, प्रवेशपत्राची प्रिंट न निघणे, प्रवेश अर्ज केलेल्या शाळांमध्ये रिक्त जागा असूनही सोडतीमध्ये एकाही शाळेसाठी नाव न लागणे आदी तांत्रिक त्रुटी आणि अडचणींमुळे विद्यार्थी २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशास पात्र असूनही या हक्कापासून वंचित राहत आहेत. राज्यातही ५० टक्के दुर्बल घटकातील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित आहेत.त्यामुळे सोडतीच्या पद्धतीची फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी ‘अनुदानित शिक्षा बचाव समिती’चे सुधीर परांजपे यांनी केली आहे.

‘प्रवेश पद्धतीतल्या अनेक तांत्रिक अडचणी पुराव्यासहित आम्ही दरवेळी संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडत आलो आहोत. परंतु तरीही याकडे कुणीही जाणीवपूर्वक लक्ष दिलेले नाही. यावर्षी ऑनलाईनच्या सदोष पद्धतीमुळे जवळपास तीन हजाराहून अनेक विद्यार्थ्यांना पाच फेऱ्यांमध्ये निवडलेल्यापैकी एकाही शाळेत प्रवेश मिळालेले नाही. ही आकडेवारी केवळ मुंबईची आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची स्थिती काय असेल?,’ असा प्रश्न परांजपे यांनी केला.

दरम्यान, प्रवेश फेरीतील तांत्रिक चुकांबाबत आम्ही लवकरच वरिष्ठांशी चर्चा करणार आहोत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे उपशिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली. या प्रवेशफेरीसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचे काम पुणे येथून

चालते. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पुण्याच्या कार्यलयाला तांत्रिक चुका सुधारण्याबाबतचे आदेश देण्यात येतील, असे ते म्हणाले.

त्रुटीच त्रुटी

  • सदोष ‘गुगल मॅपिंग’ मुळे घराच्या जवळपास शाळाच न दिसणे.
  • जवळच्या शाळांमध्ये जागा शिल्लक असतानाही त्यांची पोर्टलवर नोंद नसते.
  • प्रवेशअर्जाच्या सोडतीनंतर पालकांना संदेश पाठवण्यात येत नाही.

अशी उदाहरणे..

  • शाळा घरापासून १ ते ३ किलोमीटर अंतरावरील असावी, असा नियम आहे. परंतु कुल्र्यातील तुबा शेख या विद्यार्थिनीच्या प्रवेशअर्जामध्ये ग्रॅण्ट रोड येथील एजुब्रीज शाळा केवळ ०.४१७ किमीवर असल्याचे दाखवत आहे. वास्तवात आणि गुगल मॅपनुसार घरापासून ही शाळा २१ किमी अंतरावर आहे. कुल्र्यातील अलिना शेख या विद्यार्थिनीलाही याच शाळेचे प्रवेशपत्र मिळाले आहे. घराजवळील तीन शाळा रिक्त असूनही तिला इतक्या दूरची शाळा देण्यात आली आहे. अंतर जास्त असल्यामुळे शाळा मात्र तिला प्रवेश देण्यास नकार देत आहे.
  • खार येथे राहणारा सादिक शेख या मुलाच्या पालकाला कोणताही संदेश न आल्यामुळे पाचही फेऱ्या संपल्यानंतर चौकशी केली असता पहिल्याच फेरीमध्ये सांताक्रूझ येथील बिलबॉंग इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश मिळाल्याचे दाखवत आहे. वेळेत प्रवेशासाठी न आल्यामुळे शाळा प्रवेश देण्यास नकार देत आहे.
  • वांद्रय़ातील शबीर शेख यांच्या मुलाला ‘न्यू इंग्लिश प्री- स्कूल’मध्ये प्रवेश मिळाला. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे मुद्रित प्रत मिळवता येत नव्हती. शेख यांनी याबाबत शाळेला कल्पना दिली. परंतु प्रवेशपत्राची मुद्रित प्रत आणल्याखेरीज प्रवेश देणार नाही, असे शाळेने त्यांना सांगितले.

untitled-21