मुंबई : मुंबईत सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका सोमवारी दुपारी ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ला बसला. आझाद नगर मेट्रो स्थानकाजवळील एका बांधकाम प्रकल्पावरील एक प्लास्टिक शीट उडून ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील ओव्हरहेड इलेक्ट्रीकल लाईनवर पडली. त्यामुळे मेट्रो सेवा बंद पडली आणि एका मागोमाग एक गाड्या उभ्या होत्या. ‘मेट्रो १’ची सेवा दुपारी १ च्या सुमारास विस्कळीत झाली. ‘मेट्रो १’च्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आवश्यक त्या उपाययोजना, दुरुस्ती करून काही मिनिटांत ‘मेट्रो १’ची सेवा पूर्ववत केली. आता ‘मेट्रो १’ची सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून देण्यात आली.