केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एनडीए सरकामधून राजकीय पक्षांची गळती होत असताना देशभरातील विरोधक एकवटत आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. केसीआर यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि एमएलसी के कविता आणि पक्षाचे खासदार जे संतोष कुमार, रणजित रेड्डी आणि बी बी पाटील हे मुंबई दौऱ्यावर होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना, “नवा अजेंडा, नवी दृष्टी घेऊन हा देश व्यवस्थित चालवायचा आहे. मी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. ते अनुभवी नेते आहेत, त्यांनी मला त्यांचे आशीर्वाद दिले आहेत आणि आम्ही एकत्र काम करू. लवकरच, इतर समविचारी पक्षांसोबत बैठक आयोजित केली जाईल, अशी प्रतिक्रिया तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिली आहे.

“शरद पवारांनी तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी ज्या प्रकारे समर्थन दिले हे आम्ही कधीच विसरु शकत नाही. त्यामुळे तेलंगणाच्या जनतेकडून मी त्यांचे आभार मानतो. ते आमचे वरिष्ठ नेते आहेत. देशात ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा त्या पद्धतीने होत नाही आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही काही बदल झालेले नाहीत. याची कारणे आपल्याला शोधायला हवीत. नवीन आशा आणि नवीन अजेंड्यासह देशाला एकत्र पुढे घेऊन जाण्याची वेळ आली आहे. ते अनुभवी नेते आहेत, त्यांनी मला त्यांचे आशीर्वाद दिले आहेत. एकत्र काम करण्याची गरज असण्यावर आमचे एकमत झाले आहे. देशातल्या अन्य पक्षांसोबत एकत्र शरद पवारांकडे बारामतीमध्ये बैठक घेऊ शकतो. ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे त्यांना एकत्र घेऊन कामाला सुरुवात करु,” असे चंद्रशेखर राव म्हणाले.

फक्त विकासाच्याच बाबतीत चर्चा – शरद पवार

“आज देशाच्या समोर गरिबी, बेरोजगारीच्या समस्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी काय करता येईल याबाबत आज चर्चा झाली. तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी पावले उचलून देशाला मार्ग दाखवला आहे. त्यामुळे तिथले नेते इथे आले आहेत. यावेळी राजकीय चर्चा न होता फक्त विकासाच्याच बाबतीत चर्चा करण्यात आली. बेरोजगारी आणि गरिबीची समस्या सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली. अशाच प्रकारचे वातावरण संपूर्ण देशात तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,” असे शरद पवार म्हणाले.

सूडाच्या भोवती फिरणारे आमचे हिंदुत्व नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

केसीआर यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. “रणनीती आखण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक होते, म्हणून ही बैठक झाली. या प्रयत्नाला वेळ लागेल आणि खूप प्रयत्न करावे लागतील,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोटे बोलून दुसऱ्यांची बदनामी करण्याचा हा धंदा चांगला नाही. आज हेच सुरू आहे, असे भाजपावर हल्लाबोल करताना ठाकरे म्हणाले. भाजपाचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले की, “सूडाच्या भोवती फिरणारे हिंदुत्व हे आमचे हिंदुत्व नाही. काही लोक फक्त त्यांच्या अजेंड्यासाठी काम करतात. आपल्याला आपल्या देशाला योग्य मार्गावर आणायचे आहे. पंतप्रधान कोण होणार यावर नंतर चर्चा होऊ शकते. आजपासून आपण अनेक राजकीय नेत्यांना भेटू,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.