दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या मुंबई विभागातील उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम जवळपास ८५ टक्के पूर्ण झाले असून त्यामुळे निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. मात्र, मुंबई शहरातील उत्तरपत्रिकांचे संकलन अद्याप बाकी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतरही करोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे दोन महिने निकालाचे काम रखडले होते. रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबई आणि परिसरात असल्यामुळे उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत पोहोचवणे, त्या पुन्हा जमा करणे अशी सर्वच कामे रखडली होती. मात्र, त्यानंतर नियोजनबद्ध काम करून मुंबई विभागीय मंडळाने निकालाचे काम पूर्ण करत आणले आहे. दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम जवळपास ८५ टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुंबई विभागाचे अध्यक्ष संदीप सांगवे यांनी दिली.

नियोजन कसे?

प्रशासन आणि टपाल सेवेच्या सहकार्याने मुंबई विभागाने उत्तरपत्रिकांची ने-आण केली. पालघरपासून सुरुवात करून नंतर रायगड, ठाणे शहर, ठाणे उपनगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये उत्तरपत्रिका पोहोचवल्या. मुंबईत आणि मुंबईच्या बाहेर अडकलेल्या शिक्षकांपर्यंत उत्तरपत्रिका पोहचवण्यासाठी आपत्कालीन परवान्याची व्यवस्था करण्यात आली. उत्तरपत्रिकांच्या संकलन केंद्रांमध्येही वाढ केली. आता उर्वरित उत्तरपत्रिकांच्या संकलनासाठी मंडळ १५ आणि १६ जून रोजी विशेष मोहीम राबवणार आहे.

*   उत्तरपत्रिका संकलनाची जिल्हानिहाय टक्केवारी: ठाणे ९५, पालघर ९५ , रायगड ९३ , मुंबई ४५

*    मुंबई विभागातील परीक्षेला बसलेले विद्यार्थी : दहावी ३,९१,९९१, बारावी ३,३९,०१४

तारखेबाबत अफवांचे पेव

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. समाजमाध्यमांत परस्पर येणाऱ्या तारखांवर पालक आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. राज्य मंडळाकडून निकालाची तारीख अधिकृत माध्यमांतून जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. खोटय़ा माहितीबाबतच्या युवा सेनेच्या तक्रारीनंतर अशा संकेतस्थळांविरुद्ध राज्य मंडळाने सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tenth twelfth result work fast abn
First published on: 13-06-2020 at 00:46 IST