Navi Mumbai International Airport: गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी मुंबईकर दरवर्षी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करतात. पण मुंबईचं महत्त्व आणि मुंबईत होणारी वाढती ये-जा या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावरचा प्रवासी वाहतुकीचा ताण वाढू लागला. त्यावर पर्याय म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मार्ग निघाला व त्यावर अंमलबजावणीही झाली. लवकरच नवी मुंबई विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. मात्र, एकीकडे नवी मुंबईच्या आलिशान इमारती उभ्या राहात असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल १ अर्थात T1 पाडलं जाणार असल्याचं नियोजन प्रशासनाने केलं आहे.

मुंबई विमानतळ परिसराचा पुनर्विकास करण्याच्या मोठ्या प्रकल्पाचा भाग म्हणून टर्मिनल १ पाडलं जाणार आहे. मात्र, ते इतक्यात पाडलं जाणार नसून नवी मुंबई विमानतळावर उभारण्यात येणारं टर्मिनल २ कार्यान्वित झाल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

काही भाग आधीच बंद – अदाणी एअरपोर्ट

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वरील काही भाग आधीच सुरक्षा व व्यवस्थापन नियोजनाच्या कारणामुळे बंद ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. “सुरक्षा आणि इतर कामांमुळे टर्मिनल १ वरील काही भाग आम्ही आधीच काही प्रमाणात बंद केला आहे. पण टर्मिनल १ पाडण्याची प्रक्रिया आम्ही आणखी काही काळ करणार नाही. नवी मुंबई विमानतळावरील टर्मिनल २ कार्यान्वित झाल्यानंतर आम्ही त्याची अंमलबजावणी करू. विमानतळाच्या बांधकामाच्या सुरक्षेमुळे आम्ही आधीच टर्मिनल १ चा काही भाग तात्पुरता बंद केला आहे”, अशी माहिती अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल यांनी दिली.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नियोजन

दरम्यान, टर्मिनल १ पूर्णपणे पाडण्याचं काम आणखी काही काळ लांबवण्यामागे प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा हेतू दिसून येतो. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या अतिरिक्त प्रवासी वाहतुकीसाठीच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. एकट्या टर्मिनल १ (T1) वरून दरवर्षी १ कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करतात. ही प्रवासी वाहतूक करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी राहिल्याशिवायच टर्मिनल १ बंद करणं उरलेल्या व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण करणारं ठरेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

“पर्यायी व्यवस्था उभी राहण्याआधीच जर आम्ही टर्मिनल १ बंद केलं, तर त्या प्रवाशांची सोय आम्हाला लावता येणार नाही. असं झालं तर गेल्या ४ ते ५ वर्षांपासून मुंबई विमानतळावर ज्या गर्दीची स्थिती दिसून आली, तशीच परिस्थिती पुन्हा दिसू शकेल”, असंही बन्सल यांनी नमूद केलं.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता किती?

NMIA अर्थात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी क्षमता कोट्यवधींच्या घरात आहे. या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याची प्रवासी सेवा क्षमता वर्षाला २ कोटी असून दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर ही क्षमता ५ कोटींच्या घरात जाईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण होऊन हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतरच मुंबई विमानतळावरील टर्मिनल १ पूर्णपणे बंद करून ते पाडण्यात येईल.

Navi Mumbai International Airport: पालिका निवडणुकांपूर्वी नवी मुंबईतून विमान उड्डाण; ‘सिडको’सह शासकीय यंत्रणांची जय्यत तयारी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पुनर्विकास

दरम्यान, टर्मिनल १ चं पाडकाम हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) पुनर्विकास प्रकल्पाचाच भाग आहे. यातून या विमानतळावर अतिरिक्त प्रवासी क्षमता व अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जातील. मात्र, एकदा का टर्मिनल १ पाडलं, की तिथे नव्या इमारतीच्या उभारणीसाठी अनेक वर्षं लागू शकतात, असा अंदाज प्रकल्प व्यवस्थापक मंडळींकडून व्यक्त करण्यात आला आहे.