‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’, ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आदींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात फलक फडकवीत घोषणाबाजी केली. यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली घोषणा म्हणजे ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. मुख्यमंत्री शिंदे हे पायऱ्यांवरुन खाली उतरत असतानाच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ही घोषणाबाजी केली. ते ऐकून शिंदेंसोबतचे आमदार शंभूराज देसाईंनी पायऱ्यांवरुन उतरतानाच विरोधी आमदारांना ५० खोक्यांवरुन ऑफर दिली.

नक्की वाचा >> ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले अन्…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी करतानाच विरोधकांनी प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सहकाऱ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास अभिवादन करून सभागृहात येत असतानाच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘आले रे आले पन्नास खोके आले..खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो.’. ‘आले रे आले गद्दार आले’. ‘ईडी सरकार हाय हाय,.स्थगिती सरकार हाय. हाय’. अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळ परिसर दणाणून सोडला.  घोषणांनी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.

नक्की पाहा >> Viral Video: आदित्य ठाकरेंच्या भाषणादरम्यान BJP कार्यालयातून भाजपा कार्यकर्ते काढत होते फोटो; ही गोष्ट लक्षात येताच…

शिवसेनेतून बंडखोरी करुन बाहेर पडलेले ४० आमदार आणि १० अपक्ष आमदारांनी ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला जात आहे. याच आरोपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विधानसभेमध्ये ५० खोकेंवाली घोषणा चांगलीच चर्चेत ठरली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी पायऱ्यांवर घोषणाबाजी करत शिंदे गटाला लक्ष्य केलं. मुख्यमंत्री विधानभवनामध्ये जाताना तसेच बाहेर पडतानाही ही घोषणाबाजी झाली. मुख्यमंत्री शिंदे विधानभवनाबाहेर येत असल्याचं पाहून विरोधी पक्षाचे आमदार ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’ या तसेच हाय हाय’ च्या घोषणा देऊ लागले.

नक्की वाचा >> सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांच्या भेटीचं कारण काय? कंबोज म्हणाले, “अरे भावा, आज…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधी पक्षाचे आमदार घोषणाबाजी करत असल्याने शिंदे एका बाजूने पायऱ्यांवरुन खाली उतरत होते. त्यावेळी शंभूराज देसाई त्यांच्या पुढेच चालत होते. ५० खोकेंवाली घोषणा ऐकून वैतागलेल्या शंभूराज देसाईंनी घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांकडे पाहून, “पाहिजे? पाहिजे? अरे पाहिजे का तुम्हाला?” असा प्रश्न विचारला. हे उत्तर ऐकून मुख्यमंत्री शिंदे यांनाही आपलं हसू आवरलं नाही. हा सारा प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेरात कैद झाला.