ठाणे येथील किसननगर भागातील हबीब मंजील या अतिधोकादायक इमारतीवर बुधवारी महापालिकेचे पथक कारवाई करण्यासाठी गेले होते. मात्र, स्थानिक रहिवासी तसेच शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधामुळे या पथकास इमारतीवर कारवाई करता आली नाही. त्यामुळे महापालिकेचे पथक कारवाईविनाच रिकाम्या हाती परतले.
शीळ- डायघर येथील लकी कंपाउंडमधील इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासनाने अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींविरोधात कारवाई सुरू केली आहे. मात्र, या इमारतीमधील रहिवाशांचे आधी पुनर्वसन करा मगच इमारतीवर कारवाई करा, असा सूर लावत सर्व पक्षीय नेत्यांनी महापालिकेच्या कारवाईस विरोध सुरू केला आहे.
मध्यंतरी, अतिधोकादायक, धोकादायक तसेच अनधिकृत इमारतींवर कारवाई करू नये, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी ‘ठाणे बंद’ केले होते. दरम्यान, पावसाळा तोंडावर आल्याने महापालिकेचे पथक बुधवारी हबीब मंजील या अतिधोकादायक इमारतीवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्या वेळी स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला. तसेच याबाबत माहिती मिळताच शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी आले व त्यांनीही कारवाईला विरोध केला. इमारतीमधील नागरिकांचे आधी पुनर्वसन करा, मग इमारतीवर कारवाई करा, असे त्यांनी पथकास सांगितले. तसेच या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असून याबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत कारवाई करू नये, असेही त्यांनी या वेळी पथकास सांगितले.
त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि आमदार शिंदे यांच्या विरोधापुढे नमते घेत महापालिकेच्या पथकाने इमारतीवर कारवाई केली नाही.