मुंबई : एक काळ होता, जेव्हा मनोरुग्ण म्हणजे फक्त चार भिंतींत कैद झालेली माणसं… विसरलेली, दुर्लक्षित आणि उपेक्षित.पण आता काळ बदलतोय.ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांनी समाजात पुन्हा उभ राहण्यासाठी आत्मविश्वासाने पहिले पाऊल टाकलंय,केंद्र सरकारच्या स्किल इंडिया प्रमाणपत्राच्या माध्यमातून . रुग्णांना ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
मनोरुग्ण घरात असला की कुटुंब कायमच टेन्शन मध्ये असते. त्यामुळे भविष्यात यांचे होणार काय ही चिंता कायमच भेडसावते मात्र याला ठाणे प्रादशिक मनोरुग्णालय या रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जन शिक्षण संस्थान व ‘स्किल इंडिया आयकॉन’ फाउंडेशनच्या संयुक्त उपक्रमातून, विविध वयोगटांतील २० मनोरुग्णांना ९० दिवसांचं विशेष ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण देण्यात आलं. हे केवळ प्रशिक्षण नव्हत तर ही होती त्यांच्या नव्या आयुष्याची एक नवी सुरुवात.
रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना काहीवेळा नातेवाईक रुग्णालयात टाकून जातात.बहुतेक प्रकरणात नातेवाईक कोणतीच साथ देत नाहीत. परिणामी बरे होऊनही त्यांना रुग्णालयातच खितपत पडावे लागते. यातूनच काहीची भाषा हरवली असते, तर काहींचा आत्मा हरवलेला असतो. पण या प्रशिक्षणाने त्यांच्या डोळ्यांत एक वेगळी चमक दिसायला सुरुवात झाली.
प्रमाणपत्र वितरण सोहळा म्हणजे त्यांच्या जीवनातील ‘गौरवाचा क्षण’ होता. एकेक रुग्ण जेव्हा प्रमाणपत्र हाती घेत होता, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होत आणि मनात एक विचार होता माझ आयुष्य आता नव्याने सुरु झाले आहे.या प्रशिक्षणात त्यांना व्यवसाय कौशल्य, संवाद, स्वावलंबन आणि रोजगारक्षमतेच्या दिशा शिकवल्या गेल्या. उपचार विभागातील डॉ. सुधीर पुरी, डॉ. निलिमा बागवे, डॉ. पायल सुरपाम, डॉ. प्रियतम दंडवते, डॉ.अंकिता शेटे, यांच्या अथक परिश्रमामुळे हे रुग्ण आज नव्या उमेदीने पुढे पाहू लागलेत.
या प्रशिक्षणामुळे मनोरुग्ण केवळ उपचार घेणारे रुग्ण राहिले नाहीत. ते आता स्वतःचं जीवन उभं करण्यासाठी सज्ज झाले आहेत. समाजाने त्यांच्यावर माया केली, तर ते नव्याने फुलतील व उंच उडतील असे ठाणे मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नेताजी मुळीक यांनी सांगितले. या रुग्णांचा समाजात पुनर्वसन होणं ही आता काळाची गरज आहे. त्यांना संधी द्या, ते तुमच्या आमच्यासारखीच माणस आहेत असे जन शिक्षण संस्थेच्या संचालिका मनीषा हिंदळेकर यांनी सांगितले.