मुंबई : राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यास होणारा उशीर लक्षात घेऊन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार अंतिम मुदत २६ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील पदविका अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला २० मेपासून सुरुवात केली. या नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एकूण १ लाख २८ हजार १०२ उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी १ लाख १० हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत. नोंदणी प्रक्रियेसाठी २० मेपासून १६ जूनपर्यंत दिलेल्या मुदतीमध्येच विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आवश्यक होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळण्यास होणारा उशीर लक्षात घेऊन आणि प्रवेश प्रक्रियेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता २६ जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आणि अर्ज सादरीकरणासाठी आवश्यक माहिती https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.