scorecardresearch

‘चिंतामणी’च्या आगमन मिरवणुकीत भुरट्या चोरांची हातसफाई ; ५० हून अधिक मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा १०३ वे वर्ष साजरे करीत आहे.

‘चिंतामणी’च्या आगमन मिरवणुकीत भुरट्या चोरांची हातसफाई ; ५० हून अधिक मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल
प्रतिनिधिक छायाचित्र

काही वर्षांपूर्वी हुल्लडबाजीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ची आगमन मिरवणूक यंदाही वादग्रस्त ठरली आहे. हुल्लडबाजांनी घातलेला गोंधळ, महिला-मुलीची झालेली छेडछाड, चेंगराचेंगरीमुळे पुन्हा एकदा गणेश आगमन मिरवणुकीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मोबाइल, मौल्यवान वस्तू गहाळ अथवा चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात रविवारी दुपारपर्यंत सुमारे ५० हून अधिक मोबाइल चोरीच्या तक्रारींची नोंद झाली.

हेही वाचा – मुंबई : आरे वसाहतीमधील कारशेडविरोधात राष्ट्रवादीही रस्त्यावर

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा १०३ वे वर्ष साजरे करीत आहे. काही वर्षांपूर्वी या मंडळाची गणेश आगमन मिरवणूक वादग्रस्त ठरली होती. मिरवणुकीत सहभागी तरूणांनी हुल्लडबाजी करीत सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. तसेच महिलांची छेडछाड, चेंगराचेंगरी, मोठ्या प्रमाणावर मोबाइल आणि मौल्यवान वस्तूंची चोरी झाली होती. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली. बकरी अड्डा येथील गणेश कार्यशाळेतून चिंतामणीची आगमन मिरवणूक निघाली आणि बघताबघता मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली. भायखळ्यापासून करीरोडपर्यंतच्या परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. केवळ लालबाग, परळमधीलच नव्हे तर पूर्व-पश्चिम उपनगरांतील तरूण-तरूणी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत चेंगराचेंगरी, तसेच महिला-मुलींची छेडछाडीचे प्रकार घडले. हुल्लडबाजांनी चप्पल, पाण्याच्या बाटल्या भिरकावल्याने अधिकच गोंधळ उडाला. मिरवणुकीत होणारी गर्दी लक्षात घेऊन मंडळाने कार्यकर्त्यांची फौज तैनात केली होती. मात्र ही फौच तुटपूंजी ठरली. गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि भुरट्या चोरांचेही फावले.

हेही वाचा – एसटीतील २१५ महिला चालक-वाहकांच्या भरतीला स्थगिती कायम ; सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा

भुरट्या चोरांनी अनेकांचे मोबाईल, पैशांचे पाकीट, कॅमेरे, दागदागिन्यांवर डल्ला मारला. ढोल-ताशाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गर्दीमुळे अनेकांना मोबाइल, मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याचे समजलेच नाही. मिरवणूक आटोपल्यानंतर वस्तू चोरीला गेल्याची बाब अनेकांच्या लक्षात आली. काही जणांनी तात्काळ, तर काही जणांनी रविवारी काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीला गेलेल्या वस्तूंची तक्रार केली. रविवारी दुपारपर्यंत साधारण ५० हून अधिक मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मोठ्या संख्येने मोबाइल आणि अन्य वस्तूंची चोरी झाली असावी. मात्र अनेक जण तक्रार करण्यासाठी पुढे आलेले नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, गणेश आगमन मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनेक तरूणांनी नंतर चिंचपोकळी स्थानकात गोंधळ घातला. परिणामी, लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

काही वर्षांपूर्वी हुल्लडबाज तरुणांमुळे अनेक गणेशभक्त आणि इतर नागरिकांना नाहक त्रास झाला होता. हुल्लडबाजांमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदा चिंतामणीच्या आगमनासाठी मंडळाने योग्य पद्धतीने नियोजन केले होते. गणरायाची मूर्ती वेळेमध्ये मंडपामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. आगमन सोहळ्यात सहभागी होण्याचे कोणतेही आवाहन केले नव्हते. समाज माध्यमावरून आगमन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवले जात होते. सर्व चोख व्यवस्था केली होती, असा खुलासा चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाकडून करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The arrival procession of chintamani the thieves clean their hands mumbai print news amy