मुंबई: ‘भारतीय सिनेमा हा आशयकेंद्रित आहे. आपल्याकडे ‘आशय हाच राजा आहे’ असे म्हटले जाते. मात्र, चित्रपट व्यवसाय यशस्वी करण्यासाठी सकस आशयाबरोबरच भक्कम चित्रपट वितरण व्यवस्था म्हणजे ‘देव’ आहे. त्यामुळे चित्रपट चालण्यासाठी केवळ उत्तम आशय असून भागणार नाही, तर तो देशभरातील प्रेक्षकांबरोबरच परदेशांतही विविध ठिकाणी पोहोचवावा लागेल, जेणेकरून भारतीय चित्रपट व्यवसायाचे क्षितिज रुंदावेल’ असे मत ‘स्त्री’, ‘छावा’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे निर्माते दिनेश विजन यांनी व्यक्त केले.

‘स्टुडिओज ऑफ द फ्युचर : पुटिंग इंडिया ऑन वर्ल्ड स्टुडिओ मॅप’ या विषयावर आयोजित परिसंवादात दिनेश विजन बोलत होते. दिनेश विजन यांच्या मताला दुजोरा देत भारतीय चित्रपटकर्मींनी देशाबाहेरसुध्दा आपला प्रेक्षक निर्माण करायला हवा आणि त्यासाठी विविध देशांत वितरणाची व्यवस्था बळकट करायला हवी, असे मत आमिरने व्यक्त केले. तर हॉलिवूड निर्मात्यांकडून चित्रपट व्यवसायाची वैश्विक समीकरणे समजावून घेणे भारतीय चित्रपटकर्मींना फायद्याचे ठरेल, असे मत ‘द डार्क नाईट’ चित्रपटश्रुंखला, ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस’सारख्या चित्रपटांचे निर्माते चार्ल्स रोवेन यांनी व्यक्त केले.

वेव्हज परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘स्टुडिओज ऑफ द फ्युचर : पुटिंग इंडिया ऑन वर्ल्ड स्टुडिओ मॅप’ या विषयावरील आयोजित परिसंवादात अभिनेता आमिर खानसह, निर्माते दिनेश विजन, निर्माता रितेश सिधवानी, पीव्हीआर आयनॉक्सचे अजय बिजली, अमेरिकन निर्माता चार्ल्स रोवेन आणि ‘डीएनईजी’ व्हीएफएक्स कंपनीचे नमित मल्होत्रा सहभागी झाले होते.

भारतीय चित्रपट व्यवसाय अजूनही देशातल्या देशातच रेंगाळत आहे – चार्ल्स रोवेन

पाश्चिमात्य चित्रपटकर्मींना आपल्या देशापुरता विचार करून चालत नाही. जगभरात आपला चित्रपट कसा यशस्वी ठरेल, याचा विचार करूनच त्यांना चित्रपट निर्मिती करावी लागते, असे मत रोवेन यांनी व्यक्त केले. ‘भारतीय चित्रपटकर्मींना अनेक प्रकारे स्वातंत्र्य आहे. इथे निर्माते अनेकदा चित्रिकरण सुरू असताना किंवा चित्रपट तयार झाल्यानंतर तो कुठे प्रदर्शित करायचा याचा निर्णय घेऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, हॉलिवूडचे निर्माते चित्रपट सुरू होण्यापूर्वीच तो चित्रपटगृहात प्रदर्शित करायचा की ओटीटीवर दाखवायचा हे निश्चित करतात. चित्रपट झाल्यावर तो कुठे आणि कसा प्रदर्शित करायचा हे आम्ही ठरवूच शकत नाही’, असे रोवेन यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यामुळेच हॉलिवूडचे चित्रपट मार्केट मोठे असल्याचे स्पष्ट करतानाच भारतीय चित्रपटकर्मींनीही जगभरात चित्रपट कसा पोहोचेल? यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत, असे रोवेन यांनी सांगितले.