मुंबई : वैद्याकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेतून (नीट) स्वत:ला सिद्ध करून, गुणवत्ता असूनही प्रवेशाच्या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांना परवडत नसल्यामुळे डॉक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न दूर राहिले आहे. चार वर्षांचे वैद्याकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी खासगी महाविद्यालयांमध्ये साधारणपणे ६० ते ७० लाख रुपये तर अभिमत विद्यापीठांमधील खर्च हा १ कोटी रुपये इतका आहे.

राज्यात ‘एमबीबीएस’चे शिक्षण देणारी एकूण ६४ महाविद्यालये असून, त्यामध्ये ८ हजार १४१ जागा आहेत. यापैकी ३६ शासकीय महाविद्यालये व पाच शासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ४ हजार ९२१ जागा आहेत. खासगी २३ महाविद्यालयांमध्ये ३ हजार २२० जागा आहेत. एमबीबीएससाठी विद्यार्थ्यांचा कल शासकीय महाविद्यालयांकडे असला तरी तेथे प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता कमी असते. खासगी महाविद्यालयांचे शुल्क वर्षाला साधारणत: १५ ते १८ लाख रुपये असून, शिक्षण पूर्ण होईपर्यंत ६० ते ७० लाख रुपये शुल्कापोटी मोजावे लागतात. त्यात शिकवणी, विकासनिधी, वसतिगृह, जेवणावळ, ग्रंथालय, जिमखाना, प्रयोगशाळा आदी शुल्कांबरोबर ५० हजार रुपये मुदत ठेव घेतली जाते. ही रक्कम शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत मिळते.

‘नीट’ परीक्षेसाठी महागडे शुल्क आकारणारी शिकवणी लावली जाते. एवढे करून ६५० पेक्षा अधिक गुण मिळाले तरच सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची शक्यता असते. डहाणूमधील ‘वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’चे वार्षिक शुल्क १७ लाख ८५ हजार रुपये आहे. त्याखालोखाल नागपूरमधील ‘एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर’मध्ये १६ लाख ७० हजार, नाशिकच्या ‘एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर’मध्ये १५ लाख ९८ हजार, अहिल्यानगरमधील ‘पद्माश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील वैद्याकीय महाविद्यालया’चे वार्षिक शुल्क १५ लाख रुपये आहे. तेथे शिक्षणासाठी चार वर्षांमध्ये ६० ते ७० लाखांच्या घरात रक्कम लागते. ‘नीट’साठी शिकवणीनंतर हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे चांगले गुण मिळून आणि गुणवत्ता असूनही अनेक विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागते.

अभिमत विद्यापीठांमध्ये कोटीवर शुल्क

अभिमत विद्यापीठांमध्ये २०२५च्या शुल्कानुसार चार वर्षांत तब्बल १ कोटी रुपये मोजावे लागतात. पुण्यातील ‘भारती विद्यापीठा’त २८ लाख ५५ हजार रुपये वर्षाचे शुल्क असून पदवी मिळेपर्यंत हा खर्च १ कोटी १४ लाख रुपयांवर जातो. ‘डी. वाय. पाटील विद्यापीठा’चे शुल्क २७ लाख रुपये (एकूण खर्च १ कोटी ८ लाख), कराडमधील ‘कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’मध्ये २४ लाख ५० हजार रुपये (एकूण खर्च ९८ लाख) शुल्क आहे. ‘एमजीएम विद्यापीठा’त २३ लाख ५० हजार मोजावे लागतात तर पुण्यातील ‘सिम्बॉयसिस’मध्ये वर्षाचा खर्च १० लाख रुपये आहे.

शुल्कवाढ करणारी महाविद्यालये

● बी.के.एल. वालावलकर वैद्याकीय महाविद्यालय, रत्नागिरी १ लाख ६ हजार रुपये

● प्रकाश इन्स्टिट्यूट, सांगली ८६ हजार

● डॉ. वसंतराव पवार वैद्याकीय महविद्यालय, नाशिक ९६ हजार

● पद्माश्री डॉ. विठ्ठलराव विखेपाटील वैद्याकीय महाविद्यालय, अहिल्यानगर ९० हजार

● एमआयएमएसआर वैद्याकीय महाविद्यालय, लातूर ६५ हजार

● एसएमबीटी वैद्याकीय महाविद्यालय, नाशिक ५८ हजार

● भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्याकीय महाविद्यालय, पुणे ५० हजार

● अश्विनी वैद्याकीय महाविद्यालय, सोलापूर ४७ हजार

● एसएसपीएम वैद्याकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग १४ हजार

● जेआयआययूएस वैद्याकीय महाविद्यालय, जालना ९ हजार

एक लाखापर्यंत शुल्कवाढ

शुल्क नियामक प्राधिकरणकडून राज्यातील २२ वैद्याकीय महाविद्यालयांचे शुल्क संकेतस्थळावर जाहीर केले आहे. यातील ११ वैद्याकीय महाविद्यालयांच्या शुल्कामध्ये ५० हजार १ लाखापर्यंत वाढ झाली आहे. पाच महाविद्यालयांचे शुल्क कमी करण्यात आले असून, चार महाविद्यालयांचे शुल्क कायम ठेवण्यात आले आहे. दोन महाविद्यालये नव्याने सुरू झाली आहेत. मात्र शुल्क कायम ठेवलेल्या महाविद्यालयांचे शुल्क हे अन्य महाविद्यालयांपेक्षा जास्तच आहे. जालना व सिंधुदुर्गातील वैद्याकीय महाविद्यालयांनी सर्वात कमी शुल्क वाढ केली आहे.