मुंबई : मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि कॉंक्रीटच्या जंगलातही काहीशी निसर्गाची ठसठशीत खूण अजूनही टिकून आहे, याचे उदाहरण म्हणजे राखी धनेश या पक्ष्याचे अस्तित्व. विलेपार्ले परिसरात गेल्या तीन वर्षांपासून राखी धनेशाने आपले घरटे टिकवून ठेवले आहे. गगनचुंबी इमारती, वाहनांचा कोलाहल, सतत वाढत जाणारी गर्दी यातही या पक्ष्याने आपला अधिवास न सोडता शहरातील जैवविविधतेचा एक सकारात्मक संदेश दिला आहे.
वन्यजीव अभ्यासक आणि पक्षीमित्रांच्या मते, राखाडी धनेश सहसा दाट जंगल, हिरवाई असलेल्या भागात आढळतो. मात्र विलेपार्लेसारख्या शहराच्या मध्यवस्तीत तो सलग दिसणे हे निसर्गप्रेमींसाठी आश्चर्याचा आणि आनंदाचा विषय आहे. या भागात काही मोठ्या झाडांमुळे आणि लोकांनी त्यांचे रक्षण केल्यामुळे या पक्ष्याला अधिवास टिकवणे शक्य झाले आहे. गेली तीन वर्षे स्थानिक आणि पर्यावरणप्रेमी अजय नाडकर्णी आणि त्यांची पार्ले टिळक विद्यालयात शिकत असलेली मुलगी अनन्या राखी धनेश या पक्षाचे निरिक्षण करत आहेत.
गेले तीन वर्षे धनेश विलेपार्ले परिसरातील एका झाडावर राहत आहेत, असे नाडकर्णी यांनी सांगितले. नुकतेच नाडकर्णी यांनी धनेशची पिल्ले घरट्यातून उडून जाताना दुर्मीळ नोंद केली आहे व त्याचे छायाचित्रणही केले आहे. राखी धनेशाची विलेपार्ल्यातील ही जोडी अनुराधा प्रभू आणि अशोक प्रभू या जेष्ठ दाम्पत्याने सर्वात प्रथम पहिली होती. एका इमारतीच्या खिडकीवर काचेतील प्रतिबिंब बघून चोच मारताना ही जोडी आढळली होती.
दरम्यान, राखाडी धनेश हा धनेश प्रजातीतील मध्यम आकाराचा पक्षी आहे. त्याचा रंग पांढरा फिकट राखाडी असतो. त्यावर गर्द राखाडी छटा असते. डोके व चोच यांचा आकार विशेष ओळखण्याजोगा आहे. याच्या चोचीवर शिंग म्हणजेच कास्क असते म्हणून ह्या पक्ष्यांना शिंगचोच्या देखील म्हटले जाते. पण इतर धनेशांच्या तुलनेत तो लहान आणि साधा असतो. त्यांची चोच वाकडी आणि मोठी, काळसर टोक असलेली. शेपटी लांबट, शेपटीच्या शेवटी पांढरी पट्टी असते. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात, पण नराची चोच जरा ठळक रंगाची असते. राखाडी धनेश हा फळे, फुले, कीटक, लहान सरडे व लहान प्राणीही खातो. त्याचा आहार झाडांच्या बिया इतरत्र पसरवण्यात मदत करतो. त्यामुळे परिसरातील वनस्पती व जैवविविधतेला मोठा फायदा होतो.
अधिवास
राखी धनेश सहसा दाट झाडे असलेल्या भागात, बागांमध्ये किंवा शहरी भागात मोठ्या झाडांवर आढळतो. मुंबईसारख्या शहरात अजून थोडी जागा वाचलेली असल्याने अशा पक्ष्यांचा अधिवास दिसतो आहे.
प्रजनन
हा पक्षी झाडाच्या जुन्या ढोलीत घरटे करतो.
मादी अंडी घालून घरट्यात बंद राहते. नर तिला बाहेरून अन्न आणून देतो.
घरट्याच्या तोंडाशी चिकट माती लिंपून ते उघडे राहणार नाही याची काळजी घेतात.
सहसा मार्च ते जून या काळात प्रजननाचा हंगाम असतो.
माणसाशी जुळवून घेताना…
राखी धनेश फळे, कीटक खाणारा पक्षी आहे. त्यामुळे त्याच्या अस्तित्वामुळे परिसरातील परिसंस्थेतील संतुलन राखण्यास मदत होते. याशिवाय झाडांच्या बियांना पसरवण्यात यांची भूमिका महत्त्वाची आहे. मुंबईसारख्या परिसरात मात्र त्याने परिस्थितीशी जुळवत लोकांनी खाऊ घातलेली पुरणपोळी, चपाती, गाठीया खाकरा असे पदार्थही खाताना नाडकर्णी यांनी नोंदविले आहे.