केईएम रुग्णालयातील शिकाऊ परिचारिकांच्या वसतिगृहाची इमारत धोकादायक झाल्यामुळे वसतिगृहातील तिनशे विद्यार्थीनींना शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात हलवण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. परंतु क्षयरोग रुग्णालयात राहणे धोकादायक असल्याचे सांगून शिकाऊ परीचारिकांनी या निर्णयाला विरोध केला. त्यावर मुलींच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात येईल, तसेच त्यांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात येईल, असे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.

हेही वाचा >>>मुंबई: मेट्रो १ चे तिकीट आता व्हाट्स अपवरही

केईएम रुग्णालयातील शिकाऊ परिचरिकांच्या वसतिगृहातील छताचे प्लास्टर काही दिवसांपूर्वी कोसळल्याने एक महिला जखमी झाली होती. त्यानंतर या इमारतीची पाहणी करून ती धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले. त्या इमारतीत राहात असलेल्या शिकाऊ परिचरिकांना शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील इमारतीमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या इमारतीमध्ये एका कक्षामध्ये (वार्ड) १५० मुलींच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या रुग्णालयात राहिल्यास मुलींना क्षयरोगाची लागण होण्याची भीती आहे. रात्रीपाळी संपल्यावर पुन्हा येणे किंवा कामावर जाणे धोकादायक असून, तासिकांना उपस्थित राहणेही अवघड असल्याचे या परिचारिकांकडून सांगण्यात येत होते. आपले म्हणणे प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तीनशे विद्यार्थिनींनी आंदोलनही केले होते.

हेही वाचा >>>मुंबई: बेस्टची दुमजली वातानुकुलीत बसची प्रतीक्षा; प्रीमियम बस सेवाही नाही

आंदोलनानंतर २२ नोव्हेंबररोजी केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, महापालिका सहआयुक्त कुऱ्हाडे आणि परिचारिका विभागाच्या प्रमुख यांनी क्षयरोग रुग्णालयाला भेट दिली. मुलींकडून मागणी होत असलेल्या अँकर इमारतीमध्ये फक्त १०० मुलींच्या राहण्याची व्यवस्था होऊ शकते. तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी व तासिकांसाठी जागा पुरेशी नसल्याने तेथे विद्यार्थिनींचे स्थलांतर करणे शक्य नाही. तर क्षयरोग रुग्णालयामध्ये तीनशे विद्यार्थिनींची राहण्यासह जेवणाची, ग्रंथालयाची आणि तासिका घेण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थिनींची व्यवस्था करण्यात येणाऱ्या इमारतीत रुग्ण ठेवले जात नाहीत. इमारतीच्या तळमजल्यावर वैद्यकीय निरीक्षकांचे कार्यालय असून दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर विद्यार्थिनींची सोय करण्यात येणार आहे. तसेच चौथ्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालय असेल. मात्र अद्याप त्याचे काम सुरू झालेले नाही. विद्यार्थिनींच्या सुरक्षेची पूर्ण काळजी आम्ही घेत आहोत, असे डॉ. रावत यांनी सांगितले.

शटल बस सेवा सुरू करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थीनींसाठी केईएम रुग्णालय ते क्षयरोग रुग्णालयापर्यंत शटल बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. जेणेकरून विद्यार्थीनींना ये जा करणे सोपे होईल, असे डॉ. रावत यांनी सांगितले.