मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणाच्या तपासातील अनियमिततेचा आरोप गंभीर असल्यानेच केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांची प्राथमिक चौकशी केली जात आहे, असा दावा केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागातर्फे (एनसीबी) बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.

प्राथमिक चौकशी आणि त्यासाठी उपस्थित राहण्याच्या आदेशाविरोधात याचिका करून वानखेडे यांच्याकडून चौकशीला विलंब केला जात आहे. वास्तविक, प्राथमिक चौकशी टाळण्यासाठी वानखेडे यांनी विविध लवाद, न्यायालयांसमोर याचिका केल्या आहेत, असा दावाही एनसीबीने केला आहे.
सुशांत याच्याशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणासह एका नायजेरियन नागरिकाला अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी केलेल्या अटकेच्या तपासात अनियमितता असल्याच्या तक्रारीनंतर एनसीबीने वानखेडे यांच्याविरोधात प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यानुसार, एनसीबीने नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ या काळात वानखेडे यांना नोटीस बजावून चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकासमोर उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, आपल्याला लक्ष्य करण्यात येत असून सूड उगवण्यासाठी ही चौकशी सुरू करण्यात आली असल्याचा दावा करून वानखेडे यांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर एनसीबीने बुधवारी प्रतिज्ञापत्र दाखल करून भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा – मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

हेही वाचा – २००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका

निनावी तक्रारींच्या आधारे चौकशी सुरू केल्याच्या वानखेडे यांच्या दाव्याचेही एनसीबीने खंडन केले. एका अभिनेत्रीने वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. वानखेडे यांच्या विरोधात केलेल्या आरोपांचे स्वरूप गंभीर असल्याने त्याची पडताळणी करणे, त्यांची याप्रकरणी चौकशी करणे गरजेचे होते, असे एनसीबीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. दरम्यान, वानखेडे यांना बजावलेल्या नोटिशीवर तूर्त कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी स्पष्ट केले होते. त्यामुळे, वानखेडे यांना कारवाईपासून दिलासा मिळाला होता.