इंद्रायणी नार्वेकर

मुंबई महानगराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी सुशोभीकरण प्रकल्पाची घोषणा करून दोन महिने उलटले तरी अद्याप कामांना सुरूवात झालेली नाही. सुशोभीकरणाच्या १६ कामांपैकी अनेक कामे पालिकेच्या दरपत्रकावर नाहीत. या कामांच्या निविदा प्रक्रियेला वेळ लागत असून डिसेंबपर्यंत ५० टक्के कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गाठताना विभाग कार्यालयांची दमछाक होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर महिन्यात आदेश दिल्यानंतर पालिकेने मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला. महानगराचे सौंदर्य वाढविण्यासाठी आणि मुंबई अधिक प्रदर्शनीय करण्यासाठी महापालिकेने सुरूवातीला वेगाने पावले उचलली. प्रकल्प तात्काळ सुरू करावा आणि एकूण निश्चित कामांपैकी किमान ५० टक्के कामे डिसेंबर २०२२ अखेपर्यंत पूर्ण करावीत आणि उर्वरित कामे मार्च २०२३ अखेपर्यंत पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात हा प्रकल्प अद्याप निविदा प्रक्रियेच्या स्तरावरच रखडलेला आहे.

हा प्रकल्प एकूण १७२९ कोटींचा आहे. त्यापैकी सर्वात मोठा भाग हा रस्त्यांसंदर्भातील कामांसाठी वापरला जाणार आहे. त्यासाठी ५०० कोटींचा निधी दिला जाणार आहे. उर्वरित सोळा प्रकारच्या कामांसाठी विभाग कार्यालयांमध्ये निधी वितरित करण्यात आला आहे. या कामांसाठी कमी कालावधीच्या निविदा मागवण्यात येणार होत्या. मात्र, २५ लाखांपेक्षा अधिक किमतीची कामे करताना पालिकेच्या प्रचलित निविदा प्रक्रियेचा अवलंब केला जातो. त्यासाठी २१ दिवसांचा अवधी द्यावा लागतो. त्यानंतर कंत्राटदार अंतिम करण्याच्या प्रक्रियेसाठी वेळ लागतो. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली आहे. तसेच काही विभागांमध्ये या प्रकल्पाच्या पुनर्निविदा काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वच विभागांमध्ये प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.दरम्यान, या सुशोभीकरणाच्या कामांपैकी अनेक कामे ही पालिकेच्या दरपत्रकावर नाहीत. त्यामुळे त्याचे दर ठरवून अंदाजित खर्च काढणे, निविदा मागवणे या कामांना वेळ लागत आहे. थोडा वेळ लागेल, पण कामे पूर्ण होतील, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकल्पातील कामे कोणती?
रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभीकरण, आकर्षक प्रकाशयोजना, पदपथांवर आसने बसवणे, रोषणाई करणे, पुलाखालील जागेची रंगरंगोटी करणे, समुद्रकिनाऱ्यांवर रोषणाई, डिजिटल जाहिरात फलक, किल्ल्यावर रोषणाई, सुविधा केंद्र उभारणे अशी कामे या प्रकल्पांतर्गत केली जातील. त्यातील रोषणाईची कामे लवकर होऊ शकतात. मात्र, बांधकाम स्वरुपाच्या कामांना वेळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.