मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या ४२ दिवसांत राज्यात उष्माघाताने बाधित ७७ रुग्ण आढळून आले. त्यातील ८ ते १२ एप्रिलदरम्यान ३६ रुग्ण आढळले आहेत.

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये पारा अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांतील तापमान हे ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून नागरिकांना उन्हात न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र १ मार्चपासून १२ एप्रिलपर्यंत राज्यामध्ये उष्माघाताने बाधित झालेल्या ७७ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये राज्यामध्ये ३७३ लोकांना उष्माघाताचा त्रास झाला होता. दरम्यान राज्यामध्ये ८ ते १२ एप्रिलदरम्यान उष्माघाताचा त्रास झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. या कालावधीत ३६ जणांना उष्माघाताचा त्रास झाला असल्याचे आढळून आले आहे. उष्माघाताच्या एकूण रुग्णांपैकी ८९ टक्के रुग्ण हे या चार दिवसांत आढळले आहेत.

हेही वाचा – सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”

राज्यात सापडलेल्या उष्माघाताच्या रुग्णांमध्ये बुलढाण्यात सर्वाधिक १२ रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल सिंधुदुर्गामध्ये ९, वर्धामध्ये ८, नाशिकमध्ये ६ आणि कोल्हापूरमध्ये ५ रुग्ण सापडले आहेत. तर सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद अकोला, भंडारा, गोंदिया, नांदेड, रत्नागिरी, सातारा, उस्मानाबाद व नागपूरमध्ये प्रत्येकी एक इतकी झाली आहे.

हेही वाचा – मुंबईसह, ठाणे रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

२०२४ मध्ये आतापर्यंत सापडलेले रुग्ण

जिल्हा – रुग्ण
बुलढाणा – १२
सिंधुदुर्ग – ९
वर्धा – ८
नाशिक – ६
कोल्हापूर – ५
पुणे – ५
अमरावती – ३
ठाणे – ३
सोलापूर – ३
धुळे – ३
अहमदनगर – २
बीड – २
परभणी – २
रायगड – २
चंद्रपूर – २
जळगाव – २
अकोला – १
भंडारा – १
गोंदिया – १
नांदेड – १
रत्नागिरी – १
सातारा – १
उस्मानाबाद – १
नागपूर – १