माणसं पूर्वी एखाद्या गोष्टीबद्दल कुणाशी आपले मतभेद असतील वा त्यास आपला आक्षेप असेल तर हिरीरीनं व्यक्त होत असत… वाद घालत. समोरची व्यक्तीही त्याबद्दलची आपली मतं वा म्हणणं तितक्याच ठामपणे मांडत असे. सामंजस्यानं आणि सहिष्णु वृत्तीनं हे सगळं होत असे. मतमतांतरं वा मतभेद मोकळ्या मनानं आणि कोणत्याही भीती वा दहशतीशिवाय व्यक्त केले जात. इतकं खुलं वातावरण तेव्हा होतं. म्हणूनच दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड, यू. आर. अनंतमूर्ती आदी मंडळी त्याकाळी समाजात जागल्याची भूमिका बेधडक वठवीत असत. पण आता २०१४ सालानंतर सगळंच बदललंय.

आता सत्ताधाऱ्यांना न पचतील अशी मतं मांडली किंवा त्यांच्याशी असहमती व्यक्त केली की त्यांनी पाळलेले ट्रोलर दात-ओठ खाऊन त्या व्यक्तीच्या अंगावर धावून जातात. अशी मतं मांडणाऱ्यांना जगणं मुश्कील होईल असं थैमान घालतात. या दहशतीची लागण आता सर्वच क्षेत्रांत झाली आहे. राजकारणाचा स्तर तर इतका रसातळाला गेलाय की कुणीही सभ्य, सुसंस्कृत माणूस त्यात उतरूच नये. संविधानातील तरतुदींना हरताळ फासून वर ‘जितं मया’ म्हणत बेताल वागणं-बोलणं हीच राजकारण्यांची पहचान बनलीय. समाजमानसातही ही असहिष्णु वृत्ती हळूहळू भिनू लागली आहे. त्यामुळे हल्ली भला माणूस कशावरही व्यक्त व्हायला घाबरतो. माघार घेतो. हीच का ती आपली आधुनिकता? प्रगती? ज्ञानसाधना आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे माणसामाणसांतील अंतर कमी होईल, जात, धर्म, पंथांच्या भिंती कोसळून पडतील असं वाटलं होतं. पण याच्या अगदी उलट त्यांच्यातील दरी अधिकच रुंदावली आहे.

माणसांच्या खोट्या अस्मितांनी आणि स्वार्थाने, आपमतलबीपणाने उग्र रूप धारण केलं आहे. अशा वेळी काहीएक समन्वयवादी विचार, वास्तवाबद्दलचं मंथन करणारी कलाकृती येणं ही आजघडीला अशक्यप्रायच गोष्ट वाटत होती. पण जिगीषा-अष्टविनायक निर्मित, क्षितीज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ हे नाटक रंगभूमीवर आलं आणि आजच्या या सामाजिक रखरखाटात सुखावणारी हिरवळ उगवल्याचा प्रत्यय आला. नव्वदीच्या दशकातील आशयघन मराठी नाटकांची खंडित झालेली परंपरा पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झाल्यासारखं वाटलं.

याचं कारण या नाटकाचा विषय! भूमिका घेणं ही आजकाल दुर्मीळ झालेली गोष्ट या नाटकात ठामपणे दाखवली आहे. विवेक जयंत हा एक संवेदनशील नट. पोटापाण्यासाठी मिळेल त्या भूमिका करणारा. मात्र या वळणावर त्याला एका मालिकेत एका महामानवाची भूमिका साकारण्याची संधी मिळते आणि त्याचं आयुष्य आमूलाग्र बदलतं. त्याचंच नव्हे, तर त्याच्या भोवतालच्या माणसांचंही! त्याच्या सुप्त संवेदनेला धार येते. आजवरच्या त्याच्या मध्यममार्गी आयुष्याला अनपेक्षित कलाटणी मिळते. तो सजग होतो. आजूबाजूच्या वास्तवातले अंतर्विरोध त्याला खटकू लागतात. तो त्याविरोधात भूमिका घेऊ लागतो आणि मग घरादारासकट अवघं जग त्याच्या विरोधात जातं. पण तो जराही डगमगत नाही. या सगळ्याचा ‘डट के’ सामना करतो. आपल्याला याची किंमत चुकवावी लागली तरी बेहत्तर या निर्णयाप्रत तो येतो. त्यातून आपल्या सद्सद् विवेकबुद्धीशी प्रामाणिक राहिल्याचं नितांत समाधान त्याला मिळतं. हे सारं होत असताना आपल्या मुलीला ९३ टक्के मार्क्स मिळूनही मेडिकलला प्रवेश मिळाला नाही आणि आपल्या घरच्या शांताबाईंच्या लेकीला आरक्षणामुळे कमी टक्के मिळूनही मेडिकलला प्रवेश मिळाला या भेदभावालाही विवेक जयंत डोळसपणे सामोरा जातो. तेव्हाही तो डळमळत नाही. चॅनलने त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर, त्याच्या ‘भूमिके’वर आक्षेप घेतला असता ही भूमिका हातून गेली तरी बेहत्तर अशी भूमिका तो घेतो. मालिकेच्या लेखकावर अन्याय होऊनही तो मात्र पुन्हा नाइलाजानं चॅनलला बळी पडतो तेव्हाही विवेक आपल्या वैचारिक भूमिकेवर तितकाच ठाम राहतो. आजच्या काळात हे धाडस दाखवणं अशक्यप्राय असताना तो ते दाखवतो, हे विशेष.

विवेक जयंतच्या आजूबाजूची माणसं ही आजच्या काळातील निरनिराळ्या प्रवृत्तींचं प्रतिनिधित्व करतात. बायको उल्का व्यवहारवादी, प्रवाहाबरोबर पोहणं हेच बरोबर मानणारी. थोडक्यात सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारी. गुंड्यामामा मध्यमवर्गीय, स्वार्थलोलुप वृत्तीचा. मी, माझं – याच वृत्तीचा. कसल्याही विचारांचं अधिष्ठान नसलेला. मालिका लेेखक सोमनाथ हा विद्रोही, परंतु परिस्थितीवश तडजोड करायला राजी झालेला. शांताबाई ही सरळमार्गी, जातवास्तव स्वीकारलेली विवेकच्या घरी काम करणारी स्त्री. विवेकची मुलगी कुहू… आधुनिक जगातली… कशाशीही फारसं देणंघेणं नसलेली. तिचं तिचं एक स्वतंत्र जग आहे. अशा सगळ्या माणसांत विवेक जयंत आपली ‘भूमिका’ उराशी कवटाळून जगतो आहे… त्याची किंमत मोजून! तो त्यात यशस्वी होतो की नाही, हा प्रश्न अलाहिदा. पण तो समाजातील दहशत, अप्पलपोटी वृत्ती, पोलिटिकल करेक्टनेस याविरुद्ध उभा ठाकतो, हे महत्त्वाचं.

लेखक क्षितीज पटवर्धन यांनी आजच्या प्रचलित ‘मला काय त्याचे?’ या समाजमानसाविरोधात उभे ठाकायचे धाडस केले आहे याबद्दल प्रथम त्यांचे अभिनंदन. आरक्षण, त्याचे परिणाम, जातवास्तव, मध्यमवर्गीयांची स्वार्थी, कातडीबचावू वृत्ती, राजकारण्यांचे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचे अश्लाघ्य व्यवहार याबद्दल खणखणीतपणे काहीएक भूमिका या नाटकाद्वारे त्यांनी मांडली आहे. सामाजिक ढोंगावर ताशेरे ओढले आहेत. आणि तेही नाट्यात्मकता, रंजन यांचा तोल सांभाळून! नाटकात प्रातिनिधिक पात्रं उभी करून त्यांच्यातला संघर्ष त्यांनी मांडला आहे. मुख्य म्हणजे वास्तवाशी या सगळ्याचा जैव संबंध आहे. त्यामुळेच नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करतं आणि विचार करायलाही भाग पाडतं.

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हेही एक सजग, वैचारिक अधिष्ठान जपणारे रंगकर्मी असल्याने या नाटकाचा आशय त्यातील नाट्यपूर्णतेसह तितक्याच ताकदीनं पोहोचविण्यात ते यशस्वी झाले आहेत. नाटकातील पात्रं विशिष्ट विचार आणि मानसिकतेची वाहक आहेत हे त्यांच्या उक्ती-कृतींतून, वागण्या-बोलण्यातून त्यांनी नेमकेपणानं मांडलं आहे.

उल्का-विवेक आणि गुंड्यामामा-विवेक यांच्यातील भावनिक, वैचारिक संघर्ष त्यांनी टोकदारपणे पेश केला आहे. कुहूद्वारे आजची पिढी तसंच सोमनाथ आणि शांताबाईंच्या रूपात जातवास्तवाचे चटके सहन करणारी माणसं दिग्दर्शकाने यथातथ्य रीतीने सादर केली आहेत. चॅनेलमधली माणसंही त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तीसह नाटकात येतात. या सगळ्यांचे आंतरसंबंध, त्यांच्यातले ताण, त्यांच्या विशिष्ट ‘भूमिका’ नाटक ‘घडवतात’. या सर्वांचा एकमेळ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी उत्तमरीत्या घातला आहे. त्यातून नाटकाचा वैचारिक, सामाजिक आशय केन्द्रस्थानी येतो. नाटक संपल्यावरही तो प्रेक्षकांसोबत राहतो आणि एक विचारप्रगल्भ, अंतर्मुख करणारं नाटक पाहिल्याचं समाधान त्यांना मिळतं.

प्रदीप मुळ्ये यांनी विवेक जयंत यांचं मध्यमवर्गीय घर, त्याच्या नट असण्यातून आलेली विशिष्ट राहणी नेपथ्यातून प्रतीत केली आहे. अमोघ फडके यांची प्रकाशयोजना यातले नाट्यात्म क्षण अधोरेखित करते. अशोक पत्कींचं पार्श्वसंगीतही त्यास पूरक असंच. उल्लेश खंदारे यांची रंगभूषा आणि प्रतिमा जोशी-भाग्यश्री जाधव यांची वेशभूषा पात्रांना बाह्य रंग-रूप बहाल करते.

सचिन खेडेकर यांना बऱ्याच वर्षांच्या खंडानंतर एक अविस्मरणीय भूमिका विवेक जयंतच्या रूपानं मिळाली आहे आणि त्यांनी त्याचं अक्षरश: सोनं केलं आहे. एक पोटार्थी, पण संवेदनशील नट… त्याला मिळालेली एक ऐतिहासिक, स्वत:ला अभिनेता म्हणून सिद्ध करणारी भूमिका, त्यासाठी त्यानं केलेला अभ्यास, भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेच्या विचारांनी त्यानं भारावून जाणं, ते विचार-आचार आत्मगत करण्याचे त्याचे प्रयत्न, त्यातून घरादारांत निर्माण झालेला संघर्ष, या सगळ्याला त्याने ठाम विचारशील मार्गानं सामोरं जाणं, त्याची किंमत चुकवणं… हा सगळा आलेख त्यांनी उत्कटतेनं आणि प्रत्ययकारीतेनं व्यक्त केला आहे. त्यांच्या कारकीर्दीतली ही मैलाचा दगड ठरणारी भूमिका ठरावी. उल्का झालेल्या समिधा गुरू या टिपिकल मध्यमवर्गीय आचार-विचारांच्या गृहिणी आहेत. नवऱ्याच्या भूमिकेमुळे आपली, आपल्या मुलीची होणारी ससेहोलपट तिला मान्य नाही. तिचा हा विरोध वरवर पाहता कुणालाही योग्यच वाटेल. गुंड्यामामा- अतुल महाजन सवर्णांची अप्पलपोटी भूमिका तडफेनं मांडतात. पण विवेक त्यांना तितक्याच ठामपणे निरुत्तर करतो.

सुयश झुंजूरके सोमनाथचा विद्रोह, त्याची तडफड आणि पुढे त्यानं परिस्थितीला शरण जाणं… या भावावस्था उत्कटपणे व्यक्त करतात. जयश्री जगताप या शांताबाईंच्या भूमिकेत फिट्ट बसल्या आहेत. प्रेमळ, कामसू, कुणाच्या अध्यामध्यात न पडणाऱ्या, जातवास्तव निमुट स्वीकारणाऱ्या अशा त्या आहेत. कुहू (जाई खांडेकर) ही आजच्या तरुण पिढीची प्रतिनिधी आहे. तिच्या वागण्या-बोलण्या-व्यवहारातून ते डोकावतं. एकुणात, एक ज्वलंत सामाजिक प्रश्न कोणताही आव न आणता मांडणारं, रंजनासोबत नकळत काहीएक प्रबोधन करणारं हे वैचारिक नाटक आहे, एवढं सांगितलं तरी पुरे.