प्रेमभंग, शिक्षणातील बेताची गती, आळस आणि गुंतागुंतीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे मानसिक तोल ढळलेल्या एका तरुणाच्या भावावस्थेचे संवेदनशील चित्रण करणारे, तसेच ज्येष्ठ लेखक सतीश आळेकर यांच्या लेखणीने समृद्ध असे ‘महापूर’ हे मराठी नाटक सुवर्णमहोत्सवी वर्षात पुन्हा रंगभूमीवर आले आहे. नव्या संचातील नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा ऋषी मनोहर याने सांभाळली आहे. एका दिग्गज लेखकाने स्वतःची संहिता ५० वर्षांनंतर युवा पिढीला देऊन त्यांच्यावर विश्वास दाखविणे ही मोठी गोष्ट आहे. हे नाटक कालसुसंगत असल्यामुळे नाटकातील अस्सलपणा जपण्याचा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक ऋषी मनोहरसह कलाकारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले.

पुण्यात झालेल्या यशस्वी प्रयोगांनंतर ‘महापूर’ नाटकाचा भव्य प्रीमियर मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी होणार आहे. अभिनेता आरोह वेलणकर याने नाटकासाठी पुढाकार घेतला असून निर्मिती वाइड विंग्ज मीडिया करीत आहे. या नाटकात आरोह वेलणकरसह दिलीप जोगळेकर, प्रसाद वनारसे, रेशम श्रीवर्धनकर, धीरेश जोशी, रेणुका दफ्तरदार या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नव्याने नाटक करताना लेखक सतीश आळेकर यांनी कोणतीही बंधने घातली नाहीत. फक्त नवीन काहीही जोडू नका, कात्री मारायची तेवढी मारा, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही नवीन काहीही समाविष्ट केले नसल्याचे दिग्दर्शक ऋषी मनोहर याने स्पष्ट केले.

‘महापूर नाटक १९७५ साली लिहिले गेले होते. हे नाटक प्रेमभंगावर आधारित असल्यामुळे कालसुसंगत आहे. एक सार्वत्रिक भावना नाटकातून मांडण्यात आली आहे. एका मुलाचे एका मुलीवर प्रेम जडले, तसेच एका मुलीचे एका मुलावर प्रेम जडले आणि त्यांचा प्रेमभंग झाल्यानंतर उमटणारे पडसाद नाटकात पाहायला मिळतात. त्यांच्या डोक्यातील विचारांचा महापूर म्हणजे ‘महापूर’ नाटक आणि ही कलाकृती पुन्हा रंगभूमीवर आणताना संहितेच्या अनुषंगाने उत्तम कलाकार मिळाले. प्रत्येक प्रयोगानंतर कलाकार निवडीबद्दल झालेले कौतुक ही नाटकाच्या यशाची पावती आहे’, असेही ऋषी मनोहर याने सांगितले. तसेच सर्व कलाकार गेल्या अनेक वर्षांपासून रंगभूमीवर सक्रिय असून विविध नाटकांत काम करीत आहेत. त्यांची भाषेवर व आवाजावर उत्तम पकड आहे. त्यामुळे या कलाकारांना मी काय शिकवणार? एक दिग्दर्शक म्हणून मलाच नाटकातील कलाकारांकडून शिकायला मिळाले, अशी प्रांजळ कबुलीही त्याने दिली.

या नाटकात मुख्य भूमिका करणारा अभिनेता आरोह वेलणकर म्हणाला की, ‘पुरुषोत्तम करंडकच्या दरम्यान १५ वर्षांपूर्वी ज्येष्ठ समीक्षक माधव वझे यांनी हे नाटक तू करायला हवे, असे मला सांगितले होते. तेव्हापासून हे नाटक करण्याचा माझा मानस होता. मध्यंतरी सतीश आळेकरांसोबत एक लघुपट करत असताना हे नाटक मी करू का? अशी विचारणा त्यांना केली. योगायोगाने या नाटकाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून हे नाटक तू अवश्य कर, अशी परवानगी त्यांनी दिली.

आता हे नाटक तुमच्यासमोर सादर करताना अतिशय आनंद होतो आहे’. वैयक्तिक स्तरावर प्रेमभंग माझ्या जवळचा विषय आहे. शाळेपासून महाविद्यालयीन जीवनात विविध अनुभव आले आहेत, त्यामुळे जणू माझ्या जुन्या दिवसांचे विस्तीर्ण रूपच नाटकात आहे, असे सांगतानाच अनेकजण या काळातून जातात. त्यामुळे महापूर नाटकात भूमिका करताना नैसर्गिकपणे सर्व गोष्टी बाहेर येत आहेत, अशी मिश्कील टिप्पणीही आरोहने केली. ‘मनापासून केलेल्या गोष्टी चांगल्याच होतात, त्यामुळे मला महापूर नाटकात भूमिका करताना मजा येत आहे’, असेही तो म्हणाला.

अभिनेत्री रेशम श्रीवर्धनकर म्हणाली की, ‘सध्या रिकॉलचा काळ आहे. एकेकाळी गाजलेल्या नाटकांचे पुन्हा सादरीकरण करणे आणि संबंधित कलाकृती भावी पिढ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची संकल्पना मोलाची आहे. ‘महापूर’ नाटकातील भूमिका एक कलाकार म्हणून समाधान देणारी आहे. तसेच या नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी युवा पिढीपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील प्रेक्षक येत आहेत आणि सर्वांच्या प्रतिक्रिया सारख्याच आहेत. त्यामुळे जुन्या नाटकात काहीही बदल केलेला नसूनही नाटक आजच्या काळातील प्रेक्षकांनाही भावते आहे व आशय पोहोचतो आहे, ही कलाकार म्हणून आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे”.

नव्या संचात येणाऱ्या ‘महापूर’ नाटकाचे निर्मिती प्रमुख कुशल खोत, निर्मिती व्यवस्थापक सौरभ महाजन, पार्श्वसंगीत सारंग कुलकर्णी, प्रकाशयोजना तेजस देवधर, वेशभूषा देविका काळे, नेपथ्य रचना ऋषी मनोहर व मल्हार विचारे, तर दिग्दर्शन सहाय्य आणि रंगमंच व्यवस्था वज्रांग आफळे, गणेश सोडमिसे, मल्हार विचारे व प्रणव शहा यांनी केली आहे.