मानधन थकल्याने गृहरक्षक जवानांचे काम बंद; लोहमार्ग पोलिसांच्या अपुऱ्या मनुष्यबळावर ताण

मुंबई : उपनगरी रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणारे गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांचे चार महिन्यांपासूनचे मानधन थकीत असल्याने महिनाभरापासून त्यांची सेवा बंद झाली आहे. त्यातच अपुऱ्या मनुष्यबळामुळे लोहमार्ग पोलिसांवर गुन्ह्य़ांचा शोध घेण्यासोबत प्रवासी सुरक्षेच्या जबाबदारीचा ताणही वाढला आहे. पुरेशा बंदोबस्ताअभावी रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊ लागल्याने लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाने गृहरक्षक विभागाकडे दोन हजार जवान पुरवण्याची मागणी केली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील महिला प्रवाशांची सुरक्षा, तसेच स्थानकातील सुरक्षेबरोबरच गरज असेल तेव्हा प्रवाशांना मदत करणे इत्यादी जबाबदारी गृहरक्षक जवानांना देण्यात येते. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून या जवानांना मानधनच देण्यात आले नसल्याने १ जुलैपासून त्यांचे काम थांबले आहे. या मानधनासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध केला जातो. जवळपास १२५ कोटी रुपये मानधन थकले होते. होमगार्डची सेवा काढल्याने लोहमार्ग पोलिसांवर कामाचा ताण येऊ लागला. होमगार्ड नसल्याने लोहमार्ग पोलिसांना लोकलमधील महिलांच्या डब्यात तसेच फलाटांवरही मनुष्यबळ तैनात करावे लागते. त्यामुळे गुन्ह्य़ांचा तपास करणे, प्रवासी अपघात इत्यादी कामांवर परिणाम होत आहे.

बारा डब्यांच्या एका लोकलमध्ये तीन डबे महिलांसाठी राखीव असतात. त्यात दोन महिला डब्यात होमगार्ड आणि एका डब्यात लोहमार्ग पोलीस तैनात असतो. शिवाय फलाटांवरही गृहरक्षक जवान असतात. परंतु जुलै महिन्यापासून होमगार्ड काढून घेण्यात आले. लोहमार्ग पोलिसांचेही मनुष्यबळ कमी आहे. ३ हजार ९८६  मंजूर पदांपैकी प्रत्यक्षात ३ हजार २१८ लोहमार्ग पोलीस कर्मचारी हजर असतात. त्यात १५७ अधिकारी आणि ३ हजार ६१ कर्मचारी आहेत. या मनुष्यबळातच सध्या काम करावे लागत आहे. लोहमार्ग पोलिसांच्या मदतीला सध्या महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १५० जवान आहेत. आणखी ५० जवानांचीही गरज आहे.

मानधनासाठी निधी उपलब्ध

होमगार्डला प्रतिदिन ६७० रुपये मानधन मिळते. राज्यातील ४० हजारांहून अधिक होमगार्डचे त्यापोटीची १२५ कोटी रुपये रक्कम शासनाकडे थकीत होती. एप्रिल महिन्यापासून होमगार्डला प्रतिदिन मानधन मिळत नव्हते. जुलैपासून होमगार्डचे काम थांबवण्यात आले. लोहमार्ग पोलिसांसाठी असलेले होमगार्डही काढून घेण्यात आले. आता सुरुवातीला ७५ कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला आहे. निधी मिळाल्याने लोहमार्ग पोलिसांच्या मदतीलाही होमगार्ड देण्याची मागणी केली आहे.

होमगार्डच्या मानधनाचा प्रश्न राज्य सरकारकडून सोडवण्यात आला आहे. सरकारने काही अनुदान दिले आहे. प्रश्न सुटल्याने होमगार्ड पुन्हा सेवेत रुजू होऊ शकतील. त्यामुळे दोन हजार होमगार्ड त्वरित मिळावेत, अशी मागणी दोन दिवसांपूर्वीच होमगार्ड विभागाकडे केली आहे.

– कैसर खालिद, आयुक्त, लोहमार्ग पोलीस