बोरीवली येथील नॅन्सी काॅलनी रस्त्याची मालकी नुकतीच मुंबई महानगरपालिकेला मिळाली आहे. गेली १५ वर्षे नॅन्सी काॅलनीतील रस्त्याची मालकी खाजगी मालकाकडे होती. त्यामुळे या वसाहतीत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पालिकेला करता येत नव्हते. आता या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
बोरिवली पूर्व येथे असलेल्या नॅन्सी कॉलनीच्या रस्त्याची मालकी ही नवीनचंद्र चोगले या खाजगी मालकाकडे होती. यामुळे या रस्त्याची सुधारणा मुंबई महानगरपालिकेला करता येत नव्हती. मात्र या रस्त्याची कायदेशीर मालकी नुकतीच मुंबई महानगरपालिकेला मिळाली आहे. खाजगी मालक नवीनचंद्र चोगले यांना त्यांच्या जागेचा मोबदला मुंबई महानगरपालिकेने देण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन मालकी मिळवली असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय घाडी यांनी दिली. नॅन्सी कॉलनी परिसरात अनेक निवासी संकुले असून या परिसरात एस टी डेपो, मोठ्या बँकांच्या शाखा आहेत.
लवकरच हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार आहे. त्यासाठी गेली अनेक वर्षे, मुंबई महानगरपालिका, राज्य शासनाच्या स्तरावर अनेक बैठका घेऊन, पाठपुरावा करण्यात आल्याचे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे व संजय घाडी यांनी सांगितले. श्रीफळ वाढवून, ढोलताशे वाजवून, गुलाल उधळून व पेढे वाटून निर्णयाचा आनंद साजरा करण्यात आला. भविष्यात हा रस्ता चांगला झाल्यास या कामामुळे नागरिकांचा वाहतुकीचा वेळ वाचणार आहे तसेच बेस्टची सेवा देखील उपलब्ध होईल.