मुंबई: मालाड पश्चिमेकडील मढ – मार्वेकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आता मार्गी लागणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणारा मालवणी येथील प्रार्थनास्थळाचा बंगला तोडण्यास न्यायालयाने अखेर मंजुरी दिली आहे. मात्र नुकसान भरपाई म्हणून पालिकेला प्रार्थनास्थळाला ४.३ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. पालिका प्रशासनाने त्याकरीता मंजुरी दिली असून पालिकेच्या पी उत्तर विभागाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार आहे. तसेच मढ – मार्वेला जाणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालाड (प) येथील मार्वे रस्त्याच्या रुंदीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिकेच्या पी उत्तर विभागाने हाती घेतला आहे. या मार्गावरील मालवणी येथील प्रार्थनास्थळ आणि आजूबाजूची बांधकामांमुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. मढ मार्वेच्या दिशेला जाणाऱ्या या रस्त्यावर कायम पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रकल्प पालिका प्रशासनाने हाती घेतला होता. या रुंदीकरणाआड येणारी ७६ बांधकामे पहिल्या टप्प्यात पाडून टाकली होती. तर दुसऱ्या टप्प्यात चर्चच्या बंगल्यासह २२ बांधकामे हटवण्याची गरज होती. या बंगल्याला व अन्य दुकानांना पालिकेच्या पी उत्तर विभागाने नोटीस पाठवली होती. तसेच ही बांधकामे तोडण्याच्या बदल्यात या दुकानदारांना व प्रार्थनास्थळाला मोबदला देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने दिला होता. दुकानदारांनी पालिकेचा प्रस्ताव मान्य केला होता. त्यानुसार पालिका प्रशासनाने दुकाने हटवण्याची कारवाई केली होती. मात्र बंगल्याच्या प्रकरणात संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे बंगल्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. डिसेंबर महिन्यात न्यायालयाने या बंगल्याच्या पाडकामास स्थगिती दिली होती.

हेही वाचा… म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला २६ जानेवारीनंतरच मुहूर्त?

बंगल्याच्या पाडकामासाठी पालिका प्रशासनाने नियमानुसार प्रार्थनास्थळाला नुकसान भरपाईचे पत्रही दिले होते. बंगल्याची एकूण जागा ३०० चौरस मीटरची असून पालिका प्रशासनाच्या नियमानुसार केवळ १२० चौरस मीटर जागेचाच मोबदला दिला जात असल्यामुळे प्रार्थनास्थळाने या नुकसान भरपाईच्या मुद्द्याला आक्षेप घेतला होता. त्यामुळे ही स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे हे काम रखडले होते. मात्र न्यायालयाने सोमवारी प्रार्थनास्थळाच्या बंगल्याचे बांधकाम पाडण्यास मंजुरी दिली. मात्र त्या बदल्यात ४.३ कोटी रुपये नुकसान भरपाई चार आठवड्यांत देण्याचे निर्देश दिले.

मालाडमार्वेला जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण मार्गी लागणार

दरम्यान, पालिका प्रशासनाने अपवादात्मक प्रकरण म्हणून प्रार्थनास्थळाला अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रकरणावर पडदा पडला आहे.

प्रार्थनास्थळाच्या बंगल्यामुळे मढकडे जाणारा रस्ता अरुंद झाला असून तेथे केवळ एकच मार्गिका उपलब्ध आहे. हा बंगला हटवणे आवश्यक असल्यामुळे पी उत्तर विभागाने त्याला नोटीस पाठवली होती. हा बंगला १८७२ मध्ये बांधण्यात आला असून तो पुरातन वारसा वास्तू असल्याचा दावा प्रार्थनास्थळाने सुरूवातीला केला होता. मात्र पालिका प्रशासनाने पुरातन वारसा वास्तू विभागाकडे याबाबत विचारणा केली असता तो पुरातन वारसा वास्तूंच्या यादीत नसल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र हे प्रकरण न्यायायलात गेल्यामुळे ही कारवाई थांबली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The road leading to madh marve in malad west will be widened court approval to remove the construction of the place of worship mumbai print news dvr
First published on: 17-01-2024 at 11:00 IST