Rohit Arya Powai Studio Incident : मुंबईमधील पवई या ठिकाणी एका फिल्म स्टुडिओमध्ये गुरुवारी दुपारी रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने १७ मुलांसह दोघांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या ३५ मिनिटांत पीडितांची सुटका केली. मात्र, यावेळी झालेल्या चकमकीत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना नेमकं कशी घडली? या घटनेवेळी नेमकं काय घडलं? आरोपीने या १७ मुलांसह दोघांना ओलीस ठेवताना नेमकं काय सांगितलं होतं? याबाबतची आपबीती या घटनेतील एका मुलीने सांगितली आहे.

पवईतल्या ओलीस नाट्याबाबत एका मुलीने काय म्हटलं?

“माझं ऑडिशन झालं होतं, त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं, म्हणून मी ट्रायल शुटींग आणि वर्कशॉपसाठी आले होते. हे वर्कशॉप पाच दिवसांसाठी होतं असं आम्हाला सांगितलं होतं. मी या ठिकाणी आलेले पाच दिवस झाले होते. काल त्यांनी तीन वेगवेगळे ग्रुप केले. त्यामध्ये एक एक्झिट ग्रुप, एक रिसिव्ह ग्रुप आणि एक स्टुडीओ ग्रुप. यापैकी एक्झिट ग्रुप वाल्यांना त्यांनी कालच घरी पाठवून दिलं. तसेच बाकी राहिलेल्या दोन ग्रुपला थांबवायला सांगितलं होतं. पाच दिवसांचं वर्कशॉप संपला होतं. पण त्यांनी अचानक एक आणखी वाढवला होता”, असं या घटनेतील एका मुलीने एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.

घटना घडली तेव्हा काय घडलं?

“आधी आम्हाला वरच्या मजल्यावर पाठवलं, तेव्हा दरवाजा उघडा ठेवला होता. मात्र, त्यानंतर थोड्या वेळाने दरवाजा बंद केला. मग आम्ही थोड्या वेळाने त्यांना विचारायला लागलो की काय झालंय? आम्हाला वॉशरूमला जायचंय, त्यांनी आम्हाला सांगितलं की सीन (शुटींग) सुरू आहे, तुम्ही शांत राहा असं सांगितलं आणि दरवाजा उघडलाच नाही. मात्र, आम्हाला थोड्या वेळाने इमारतीच्या खालून आमच्या आई-वडिलांचा जोरात आवाज आला. मग माझ्या आज्जीने माझ्या आईला फोन लावला आणि रडायला लागली”, असं त्या मुलीने म्हटलं.

“आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी ठेवलं होतं. तेव्हा त्यांच्याकडे एक गन (बंदूक) होती. बंदूक त्या ठिकाणी ठेवली होती आणि आम्हाला सांगितलं होतं की जास्त काही बोललात तर आम्ही काहीतरी करू. जेव्हा आम्हाला खोलीत ठेवलं होतं, तेव्हा त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या पालकांना सांगा की पैसे आणून द्यायला, जेव्हा बंदूक आम्हाला दाखवली तेव्हा आम्ही सर्वजणच घाबरलो होतो. पण त्यानंतर काही वेळातच आम्हाला वाचवण्यासाठी पोलिसांनी एक काचेचा दरवाजा फोडला आणि आमची सुटका झाली”, असं या घटनेतील एका मुलीने सांगितलं आहे.

पोलीस चकमकीत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

एका फिल्म स्टुडिओमध्ये रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने १७ मुले आणि एका ज्येष्ठ नागरिकासह १९ जणांना ओलीस ठेवलं होतं. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अवघ्या ३५ मिनिटांच्या कारवाईत पीडितांची सुटका केली. मात्र, या कारवाईत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला. चित्रपटाच्या ऑडिशनदरम्यान आरए स्टुडिओमध्ये पीडितांना आपल्या विविध मागण्यांसाठी कोंडून ठेवणाऱ्या रोहित आर्यला वाटाघाटीदरम्यान पोलिसांची गोळी लागली. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.