मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) या टप्प्याच्या कामाला वेग दिला आहे.  आतापर्यंत या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबरमध्ये पूर्ण करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाणार आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईकरांचे भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमीच्या मेट्रो प्रकल्पातील मेट्रो ३ मार्गिकेची संपूर्ण जबाबदारी एमएमआरसीवर आहे. ३३.५ किमीची ही मार्गिका याआधीच वाहतूक सेवेत रुजू होणे अपेक्षित होते. मात्र कारशेडचा वाद आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे या मार्गिकेच्या पूर्णत्वास विलंब झाला. पण आता मात्र ती मार्गिका शक्य तितक्या लवकर मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याच्या निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. त्यानुसार दोन टप्प्यात या मार्गिकेचे काम केले जात असून आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये पूर्ण करण्याचे एमएमआरसीने जाहीर केले आहे. बीकेसी ते कुलाबा हा दुसरा टप्पा २०२४ च्या मध्यावर पूर्ण होणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई मेट्रो वनविरोधात एसबीआयकडून दिवाळखोरीची याचिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरु असून आतापर्यंत या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. एमएमआरसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार स्थानक आणि भुयाराचे ९८.२ टक्के, स्थानकाचे बांधकाम ९४.५ टक्के, विविध यंत्रणेचे ७०.५ टक्के, रुळांचे ९७.७ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकीकडे बांधकाम वेगात सुरु असताना दुसरीकडे एमएमआरसीकडून पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक अशा नऊ मेट्रो गाड्या मुंबईत आणण्याच्या कामासही वेग दिला आहे. आतापर्यंत आंध्र प्रदेशातील श्रीसिटीतून नऊपैकी पाच गाडया मुंबईत दाखल झाल्या आहेत. तर लवकरच चार गाड्या मुंबईत आणल्या जाणार आहेत.