लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या गोखले पुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम रखडण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील उताराचे कामही अपूर्ण असल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. पुलाच्या दोन मार्गिका येत्या पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे उद्दिष्ट्य होते. मात्र दोन मार्गिका सुरू होण्यास आता नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. संपूर्ण पुलाची पुनर्बांधणी महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे. मात्र पुलाच्या बांधकामाबाबत महानगरपालिका प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप साटम यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.

आणखी वाचा- मुंबईः निष्कासन कारवाईदरम्यान महानगरपालिका अधिकाऱ्याला मारहाण

अंधेरी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या गोखले पूलाचा काही भाग जुलै २०१८ मध्ये कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत दोन जण दगावले होते, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक एक दिवस बंद ठेवावी लागली होती. दुर्घटनेनंतर रेल्वेने या पुलाची दोन्ही बाजूची मार्गिका बंद ठेवली होती. मार्गिकेची दुरुस्ती करून ती पादचाऱ्यांसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर पुलाच्या उताराच्या भागाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. या कामासाठी २०२० मध्ये कार्यादेश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात १८ महिने विलंबाने नोव्हेंबर २०२१ मध्ये या कामाला सुरुवात झाली. महानगरपालिकेच्या हद्दीतील काम आता पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप ते पूर्ण झालेले नाही, असे साटम यांनी पत्रात नमुद केले आहे.

आणखी वाचा- राज्यात अवघे ५६ हजार युनिट रक्त, शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा पूल नोव्हेंबर २०२२ मध्ये धोकादायक बनला होता. त्यामुळे रेल्वेच्या हद्दीतील पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन पुलासाठी तुळई बनवून ती बसवण्याचे काम महानगरपालिका करणार आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट होते. तब्बल ९० मीटर लांबीच्या तुळईचे भाग तयार करून ते जागेवर आणून जोडण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यावर सिमेंट काँक्रिटची जोडणी करण्यात येणार आहे. हे सुटे भाग तयार करण्याचे काम चंदिगढ येथे करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या स्टीलच्या उत्पादकांचा संप सुरू असल्यामुळे हे काम रखडण्याची चिन्हे असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने नुकतेच जाहीर केले होते. हे काम पूर्ण होण्यास नोव्हेंबर उजडण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी महानगरपालिकेच्या हद्दीतील पुलाच्या कामासाठी इतका विलंब का, असा सवाल साटम यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून पुलाचे काम लवकर व्हावे याकरिता आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी यांनी केली आहे.