मुंबई : मुंबई महानगरात परप्रांतीयांचे लोंढे वाढल्याने कसारा, खोपोली, डहाणूपर्यंतच्या परिसरातील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. बदलापूर, अंबरनाथमध्ये प्रचंड लोकवस्ती वाढली असून त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर ताण पडत आहे. त्यामुळे कल्याण-बदलापूर तिसरी, चौथी रेल्वे मार्गिका तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत २१ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे सेवा अधिक वेगवान होईल, तसेच लोकल फेऱ्यांची संख्या वाढविणे शक्य होईल. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने हा प्रकल्प लाभदायी ठरणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळने (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा ३ अ (एमयूटीपी ३ अ) अंतर्गत कल्याण – बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या कामानिमित्त इमारती, कव्हर ओव्हर शेड, फलाट आणि इतर पायाभूत सुविधांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या निविदांची अंतिम मुदत २० मार्च २०२४ पर्यंत आहे. त्यानंतर या प्रकल्पाचे काम अधिक वेगाने होईल, असा विश्वास एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला.

हेही वाचा – यंदा गणेशोत्सवात चार दिवस १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर, वर्षभरातील १३ दिवसांची यादी जाहीर

सध्या कल्याण – बदलापूरदरम्यान दोन रेल्वे मार्गिका असून यावरून लोकल, लांबपल्ल्यांच्या गाड्या, मालगाड्या धावतात. त्यामुळे दोन मार्गिकेवर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. तसेच बदलापूरवरून सीएसएमटी जाणाऱ्या लोकलचा वक्तशीरपणा पूर्णपणे ढासळला आहे. तसेच विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथे लोकवस्ती वाढल्याने प्रवाशांकडून जादा लोकल फेऱ्यांची मागणी केली जात आहे. यासाठी कल्याण – बदलापूरदरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करून पूर्णपणे लोकल फेऱ्यांसाठी समर्पित स्वतंत्र रेल्वे मार्गिका उभारून जादा लोकल फेऱ्या वाढवणे शक्य होईल, असे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

या प्रकल्पाचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. स्थानके, रेल्वे यार्ड आणि पुलांसाठीच्या सर्वसाधारण आराखड्यांना मंजुरी मिळाली आहे. ९.९ हेक्टर खासगी जागेपैकी ८.४५ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर, २.८२ हेक्टर सरकारी जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. ०.२५ हेक्टर वन जमिनीच्या संपादनाला पहिल्या टप्प्याची मंजुरी मिळाली आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील मंजुरीसाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. सर्व उड्डाणपुले, जल व इतर वाहिन्या पूल व नवीन स्थानकांच्या बांधकामासह विविध घटकांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत, असे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – पात्र ५८५ गिरणी कामगार अखेर हक्काच्या घरात, कोन पवनेलमधील घरांचे वितरण

कल्याण-बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका प्रकल्पमंजूर खर्च – १,५०९.८७ कोटी रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सद्यस्थिती – २१ टक्के काम पूर्णप्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य डिसेंबर २०२६