लोकाग्रहास्तव जास्तीत जास्त खेळ वाढवून ‘दुनियादारी’ हा चित्रपट दाखविण्यात येत असतानाही केवळ बडय़ा कलाकाराचा हिंदी चित्रपट म्हणून ‘दुनियादारी’चे खेळच काढून टाकण्याच्या सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांच्या निर्णयाविरोधात मनसेच्या चित्रपट सेनेने बुधवारी जोरदार आंदोलन केले. ‘दुनियादारी’चे खेळ बंद केले तर शाहरूख खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ प्रदर्शित करू दिला जाणार नाही, असा इशारा मनचिकसेनेने दिला आहे.
‘दुनियादारी’तुफान गर्दीत सुरू असताना अशा प्रकारे चित्रपटगृहांचे खेळ रोखणे चुकीचे आहे. त्यामुळेच आम्ही आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी काही ठिकाणची ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाची पोस्टर्स फाडण्यात आली असून गुरुवारी आणखी अनेक ठिकाणी मनसे चित्रपट सेनेतर्फे आंदोलन केले जाणार आहे, असे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले.
ईदच्या मुहूर्तावर शाहरूखचा चित्रपट पहिल्यांदाच प्रदर्शित होत आहे. आतापर्यंत सलमान खानचे चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले आणि ते तुफान यशस्वी ठरले. मात्र पहिल्यांदाच सलमानचा कोणताही चित्रपट नसल्याने शाहरूख खानने या ईदला आपल्या चित्रपटाला फायदा मिळावा यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. ‘चेन्नई एक्स्प्रेस’साठी जास्तीत जास्त चित्रपटगृहे आणि खेळांचे बुकिंग निर्मात्यांकडून केले जात आहे. पण सतत दोन आठवडे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असलेल्या ‘दुनियादारी’च्या खेळांना त्याचा फटका बसणार आहे. ‘दुनियादारी’चे निर्माते नानुभाई जयसिंघानी यांनी आपल्याशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणली. त्यामुळे आपण आंदोलन पुकारल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. तर दुसरीकडे मल्टिप्लेक्समध्ये ८ ऑगस्टनंतरही ‘दुनियादारी’ला बुकिंग मिळणार असून सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये मात्र ८ ऑगस्टपर्यंतच बुकिंग मिळाल्याची माहिती दिग्दर्शक संजय जाधव यांनी दिली. केवळ सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांच्या मालकांनी हा निर्णय घेतल्यामुळे समस्या उद्भवली असल्याचे संजय जाधव म्हणाले. मात्र यासंदर्भात आपण मनसेशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधलेला नाही, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
बिगबजेट हिंदी चित्रपटांच्या निर्मात्यांकडून चित्रपटगृहांच्या बुकिंगबाबतची मक्तेदारी नेहमीच केली जाते. अशा स्थितीत लोकांचा प्रतिसाद लाभत असलेल्या मराठी चित्रपटाला एक प्रकारची सुरक्षितता असायला हवी, असा मुद्दा ‘दुनियादारी’चे सहनिर्माते आणि ‘झी टॉकीज’चे व्यवसाय प्रमुख निखिल साने यांनी मांडला.
लोकांना ‘दुनियादारी’ अधिकाधिक खेळ हवे असल्यामुळेच हे आंदोलन उभे राहिले आहे, असे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.